होय, मीच कार्यकर्त्यांना दहिहंडी साजरी करण्यास सांगितले -राज ठाकरे - दहीहंडी उत्सव
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेत दहीहंडी साजरी करण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य केले. सध्या लॉकडाऊन आवडे सरकारला अशी स्थिती झाली आहे. यांनी सभा, मेळावे घ्यायचे; आम्ही दहीहंडी साजरी करायची नाही का? असा सवाल उपस्थित करत भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला ते चालतं का असे राज ठाकरे म्हणाले. सर्व गोष्टी सुरू आहेत. महापौर बंगल्यावर येणाऱ्या बिल्डरांच्या गाड्या कमी झाल्या नाही. कुठेच काही कमी झाले नाही, मग तुम्ही सणांवरच का येता? जनआशीर्वाद यात्रेला लॉकडाऊन नाही, सण आला की लॉकडाऊन लागतो. फक्त सणांमधूनच रोगराई पसरते, यात्रेतून नाही पसरत का असे राज म्हणाले. मंदिरं उघडलीच पाहिजेत असे म्हणत मंदिरं उघडली नाही तर सर्व मंदिरांच्या बाहेर घंटानाद करण्याचा इशाराही राज ठाकरेंनी दिला. यावेळी यांची बाहेर पडायला फाटते यात आमचा काय दोष असा टोलाही राज यांनी लगावला. तर अण्णा इतके दिवस होते कुठे असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणारा फेरीवाला पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल, त्या दिवशी आमच्याकडून मार खाणार. यांची मस्तीच उतरवली पाहिजे, यांची हिंमत कशी होते. निषेध करून हे सुधारणार नाही असे राज म्हणाले. महाविकास आघाडीतील नेत्यांवरील ईडीच्या कारवाईवर बोलण्यास नकार दिला. यानंतर भाजपचे काही नेते तुम्हाला भेटले होते असा प्रश्न विचारल्यावर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदच गुंडाळून घेतली.
Last Updated : Aug 31, 2021, 2:03 PM IST