साकीनाका येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी - राजेश टोपे - दोन फिरत्या रुग्णालयाचे लोकार्पण
जालना - मुंबईत साकीनाका येथे झालेली घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे. अशा प्रकारच्या प्रवृतीला कायद्याच्या बडग्याने ठिक केले पाहिजे. महाविकास आघाडी सरकार करत असलेल्या शक्ती कायद्यातून अशा प्रकारचे क्रुर कृत्य करणाऱ्या नराधमाच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे जालना येथे म्हणाले. आयसीआयसीआय बँकेमार्फत सीएसआर फंडातून जालना जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या अत्याधुनिक दोन फिरत्या रुग्णालयांचे लोकार्पण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री टोपे म्हणाले, आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या सीएसआर फंडातून जालना जिल्ह्यासाठी अत्याधुनिक व सर्व सुविधांनी युक्त असे दोन फिरते दवाखानेच उपलब्ध करून दिले आहेत. या फिरत्या दवाखान्यामध्ये अत्याधुनिक उपकरणे, औषधी तसेच डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यामुळे या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागामध्ये नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. या फिरत्या दवाखान्याला जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली असल्यामुळे जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांना मिळणार असल्याचे सांगत या फिरत्या दवाखान्यांचा उपयोग गोरगरीब जनतेसाठी व्हावा, अशी अपेक्षाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.