मोजे' विकणाऱ्या हाती पुन्हा येणार 'पुस्तकं; १० वर्षाचा वंश आता जाणार शाळेत
पंजाबच्या लुधियानामधील हा व्हिडिओ आहे. रणरणत्या उन्हात गळ्यात टोपली अडकवून मोजे विकणाऱ्या या १० वर्षाच्या मुलाचा व्हिडिओ ७ मे ला व्हायरल झाला होता. करोनाचे संकट डोक्यावर घोंघावत असताना अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेक कुटुंब आपले आर्थिक संकट दूर करण्यासाठी कामाच्या शोधात आहे. तर काही जण हाताला मिळेल ते काम करत आहेत. अशाच प्रकारे चिमुकल्या वंशनेसुद्धा मोजे विकायचे काम सुरु केले. आर्थिक चणचण असूनसुद्घा हा मुलगा जास्त पैसे घेण्यास नकार देतो. तो आपले काम प्रामाणिकपणानं करून मोजे विकतो. लहानग्या वंशचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला, की पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही त्याच्या निरागसतेची आणि प्रामाणिकपणाची प्रशंसा केली. त्यानंतर त्यांनी जिल्हा उपायुक्तांमार्फत त्याच्याशी संपर्क साधला. त्याच्याशी व्हिडिओ कॉलद्वारेही संवादही साधला. त्यांनी वंशच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली आणि घर, शाळा आणि शिक्षणाचा खर्चही उचलणार असल्याचं सांगितले. आता मी मोजे विकण्याचे काम करणार नसून शाळेत जाऊन अभ्यास करणार असल्याचे वंशने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.