हैदराबाद World Mental Health Day 2023 : व्यक्तीचं मानसिक आरोग्य स्वस्थ असलं, तर व्यक्तीचं आयुष्य सुंदर होते. मात्र जगभरातील एक अब्ज नागरिक मानसिक आजाराला बळी पडले आहेत. सध्याच्या घडीला या संख्येत भरच पडत आहे. त्यामुळे मानसिक आजारानं ग्रस्त असलेले नागरिक मोठ्या प्रमाणात आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. याबाबत जागतिक पातळीवर मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मानसिक आरोग्याची गरज, मानसिक आरोग्याची हानी, मानसिक आरोग्य ढासळलेल्या व्यक्तीला उपचारांची जागरुकता, यासाठी 10 ऑक्टोबरला जगभरात 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' साजरा करण्यात येतो. जाणून घेऊया मानसिक आरोग्य दिनाची थीम आणि इतिहास याबाबतची सविस्तर माहिती.
काय आहे जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम :जागतिक मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबरला जगभरात साजरा करण्यात येतो. 'जागतिक मानसिक आरोग्य दिन 2023' ला 'मानसिक आरोग्य हा मानवी हक्क आहे' ही थीम निवडण्यात आली आहे. जागतिक स्तरावर या थीमची निवड मतदानानं निश्चित करण्यात आली. त्यासह वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ (WFMH) सदस्य, जागतिक पातळीवर मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि इतर सामाजिक संस्थाचं मत ही थीम निवडताना विचारात घेतलं आहे.
काय आहे जागतिक मानसिक आरोग्य दिनाचा इतिहास :'वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ'च्या वतीनं 10 ऑक्टोबर 1942 ला पहिल्यांदा जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी 10 ऑक्टोबर हा दिवस मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी जगभरात मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. चर्चासत्रं, जनजागृती रॅली यामधून मानसिक आरोग्याचं महत्व पटवून दिलं जाते.