हैदराबाद :World Day Of The Deaf दरवर्षी 24 सप्टेंबर रोजी जागतिक कर्णबधिर दिन साजरा केला जातो. वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेफच्या म्हणण्यानुसार, सध्या जगभरात 70 दशलक्षाहून अधिक लोक बहिरेपणा किंवा ऐकू न येण्यानं त्रस्त आहेत. त्यापैकी 80% पेक्षा जास्त विकसनशील देशांतील आहेत. बहिरेपणा किंवा ऐकू न येणं ही विविध कारणांमुळं असू शकतं परंतु एकदा पीडित व्यक्तीला या समस्येचा त्रास झाला की त्याला/तिला इतरांशी संवाद साधण्याव्यतिरिक्त अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. जसं की कामाच्या ठिकाणी किंवा समाजात इतर लोकांमध्ये मिसळण्यात समस्या. कधी-कधी कर्णबधिर व्यक्तींना समाजातच नव्हे तर नातेवाईक किंवा कुटुंबीयांकडूनही उपेक्षेचा सामना करावा लागतो.
जागतिक कर्णबधिर दिनाचे उद्दिष्ट :बहिरेपणाची कारणं समजून घेणं आणि त्यावर वेळीच उपचार करण्यासाठी उपाययोजना करणं तसेच कर्णबधिरांना समाजात आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणं आणि त्यांना सामान्य जीवन जगण्याच्या संधी निर्माण करणं देखील खूप महत्वाचं आहे. यासाठी दरवर्षी 24 सप्टेंबर हा दिवस "आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह" म्हणून साजरा केला जातो आणि सप्टेंबरचा शेवटचा रविवार "जागतिक कर्णबधिर दिन" म्हणून पाळला जातो. यावर्षी 2023 चा जागतिक कर्णबधिर दिन 24 सप्टेंबर रोजी “सर्वांसाठी कान आणि श्रवण काळजी” या थीमसह साजरा केला जात आहे. बहिरेपणा किंवा श्रवणदोष हा एक प्रकारचा अपंगत्व मानला जातो. या समस्येनं ग्रस्त असलेल्या लोकांना इतरांचं पूर्णपणे ऐकणं कठीण वाटतं. परंतु याचा अर्थ असा नाही की ते इतरांशी संवाद साधू शकत नाहीत. बहिरेपणाचा त्रास असलेले लोक सांकेतिक भाषा शिकून आणि काही विशेष प्रशिक्षणाच्या मदतीनं इतर लोकांशी संवाद साधू शकतात किंवा त्यांचे विचार शेअर करू शकतात. मात्र यासाठी केवळ बहिरेपणाचा सामना करणाऱ्या लोकांनाच नाही तर त्यांच्याशी संबंधित लोक, त्यांचे मित्र आणि इतरांनीही या दिशेनं प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून कर्णबधिरांनाही सामान्य जीवन जगता येईल.