हैदराबाद :उन्हाळ्यात उकाड्यामुळे केसांसह त्वचेलाही विविध त्रासाचा सामना करावा लागतो. त्यामुळे उन्हाळ्यात उकाड्यामुळे अॅलर्जीचा खूप मोठा त्रास होतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात केस आणि त्वचेच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारची अॅलर्जी झाल्यास काळजी घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे मत उत्तराखंडच्या त्वचारोग तज्ज्ञ डॉ. आशा सकलानी यांनी व्यक्त केले आहे.
उन्हाळ्यात होतो हा त्रास :उन्हाळ्यात प्रचंड उकाडा असल्यामुळे त्वचेची आणि केसांची स्वच्छता करणे गरजेचे असते. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात उकाडा, घाम येणे, हवेतील आर्द्रतेचा अभाव आणि वातावरणातील धुळीचे प्रमाण यामुळे त्वचेला अनेक समस्या उद्भवू शकतात. त्वचेची अॅलर्जी, उन्हाची अॅलर्जी, उष्णता, खाज सुटणे, कोरडी त्वचा, केसांमध्ये कोंडा आणि डोक्यावर मुरुम किंवा पुरळ उठणे आदी विकार उन्हाळ्यात होतात. मात्र या समस्या कशा टाळायच्या याबाबतची माहिती खास ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी उत्तराखंडच्या त्वचारोग तज्ज्ञ डॉ. आशा सकलानी यांनी दिली आहे.
कशा सोडवाव्यात त्वचेच्या समस्या :या ऋतूत त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या तुम्हाला होऊ शकतात. जे नागरिक घराबाहेर कडक सूर्यप्रकाशात राहतात, त्यांना सहसा त्वचेची जळजळ, त्वचेवर जास्त टॅनिंग, त्वचेमध्ये ओलावा नसल्यामुळे कोरडेपणा वाढणे आणि इतर अनेक प्रकारची शक्यता असल्याची माहिती डॉ. आशा सकलानी यांनी दिली. उन्हाळ्यात जास्त घाम येणे, उष्णता, पुरळ आदीसारख्या त्वचेच्या रोगाचे प्रमाणही वाढते. उष्णतेमुळे होणारी पुरळ ही त्वचेची अॅलर्जी आहे. यामध्ये पाठीवर, मानेवर, चेहऱ्यावर लहान लाल डागांच्या स्वरूपात पुरळ दिसून येते. घामामुळे छिद्रे बंद झाल्यामुळे असे होत असल्याचा दावाही आशा सकलानी यांनी केला आहे.
घामामुळे होतो संसर्ग :दुसरीकडे शरीरातील मांड्यांचे सांधे, प्रायव्हेट पार्ट्स आणि बगलेत, अनेकवेळा उष्णतेमुळे समस्या आणखी वाढतात. ही जागा हवेच्या थेट संपर्कात येत नसल्याने घाम सहज सुकत नाही. त्यामुळे अनेकवेळा घामाचे कण आणि त्यामुळे साचलेली घाण जमा होऊ लागते. या ठिकाणी बुरशी आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढत असल्याचेही सकलानी यांनी स्पष्ट केले. अनेकांना सूर्य प्रकाशाची अॅलर्जी देखील असते. याला सूर्यप्रकाश संवेदनशीलता असेही म्हणतात. तीव्र सूर्यप्रकाशामुळे या समस्येने ग्रस्त लोकांमध्ये अॅलर्जीची प्रतिक्रिया दिसून येते. तीव्र सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना त्यांच्या त्वचेचा रंग बदलत असल्याने बहुतेक प्रकरणांमध्ये ते काळे पडतात. याशिवाय त्वचेवर पिंपल्स किंवा लाल पुरळ उठू लागते. उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेशी संबंधित अॅथलीट फूट, नखांचा संसर्ग, बोटांच्या दरम्यानच्या जागेत संसर्ग वाढतो. परंतु सिरोसिससारख्या त्वचेच्या आजारांच्या बाबतीतही समस्या वाढत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कशा होतात केसांच्या समस्या :उन्हाळ्यात डोक्याला जास्त घाम येत असल्याने रोज डोके धुवायची गरज पडते. अशा परिस्थितीत डोके धुण्यासाठी तीव्र रसायनयुक्त शॅम्पू वापरल्यास डोक्याची त्वचा कोरडी होऊ लागते. त्यामुळे डोक्यातील कोंडा, मुरुम, खाज सुटणे, कमकुवत आणि जास्त प्रमाणात केस तुटणे यासारख्या समस्या टाळूला त्रास देऊ लागतात. दुसरीकडे डोक्याला जास्त घाम येत असताना घाम सुकत नाही. त्याचे कण केसांच्या मुळांमध्ये गोठू लागतात. जे धूळ, माती आणि कधीकधी केसांच्या मुळांवर आणि टाळूवर घाण साचण्याचे कारण बनतात. त्यामुळे केसांचे कूप अडकतात. अशा परिस्थितीत फोड येणे, खाज येणे आणि कधीकधी उवा होण्याची शक्यता वाढत असल्याचेही आशा सकलानी यांनी यावेळी सांगितले आहे.