हैदराबाद :सध्या ५जी आल्यापासून नागरिकांचा ऑनलाईन गेम खेळण्याकडे ओढा वाढला आहे. अनेक नागरिक ऑनलाईन गेम खेळण्यातून पैसे कमावत आहेत. मात्र आता १ एप्रिलपासून ऑनलाईन गेममधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकर द्यावा लागणार आहे. नाहीतर मोठा भुर्दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. जाणून घ्या काय आहेत, ऑनलाईन गेमबाबत आयकर विभागाच्या वतीने करण्यात आलेले नियम.
अगोदर १ जुलैपासून लागू होणार होता कर :आयकर विभागाने ऑनलाईन गेममधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकर लागू करण्याचे धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार १ जुलैपासून ऑनलाईन गेमवर आयकर लागू करण्यात येणार असल्याची घोषणाही आयकर विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आली होती. मात्र आता २०२३ ते २०२४ या आर्थिक वर्षासाठी १ एप्रिलपासून आयकर लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत सरकारने लोकसभेत वित्त विधेयक सादर करुन तारीख बदलून घेतली आहे. त्यामुळे ऑनलाईन गेमवर १ एप्रिलपासून टीडीएस लागू करण्यात येणार आहे.