हैदराबाद :आपल्या जीवनशैलीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक छोट्या गोष्टीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. निरोगी राहण्यासोबतच आजारांपासून दूर राहण्यासाठी आपल्या आहाराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तारुण्यात शरीर मजबूत आणि निरोगी राहते, परंतु वयाची ३० ओलांडल्यानंतर शरीरात अनेक समस्या दिसू लागतात. अकाली वृद्धत्व रोखण्यासाठी मानसिक ताणतणाव, आहार, व्यायाम आणि झोप यांची पूर्ण काळजी घ्यावी, असा सल्लाही आरोग्य तज्ज्ञ देतात. वयाच्या 30 व्या वर्षी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल यावरून ठरते की पुढची 10 ते 12 वर्षे तुमच्यासाठी कशी असणार आहेत. या वयात तुमचा डाएट प्लॅन कसा असावा ते जाणून घ्या.
- फायबरयुक्त पदार्थ खा : तुमच्या आहारात फायबरचा समावेश केल्यास हृदयरोग, टाइप २ मधुमेह आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. शरीराला दररोज किमान 30 ग्रॅम फायबर मिळाले पाहिजे, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा.
- ओमेगा 3 देखील महत्वाचे :मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स अत्यंत आवश्यक असतात. हे मूड सुधारण्यासाठी, जळजळ कमी करण्यासाठी, आयुर्मान वाढविण्यासाठी तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तुमच्या आहारात सॅल्मन किंवा सार्डिन माशांचा समावेश करा. तुम्ही डायफ्रूटस् देखील खाऊ शकता.
- कॅल्शियम : शरीरातील हाडांची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. वयाच्या ३० वर्षानंतर हाडे थोडी कमकुवत होऊ लागतात. या वयात दूध, दही, पनीर, ब्रोकोली, पालक, काळे, बदाम असे उच्च कॅल्शियमयुक्त पदार्थ खावेत.
- प्रथिनांची काळजी घ्या: स्नायूंच्या वाढीसाठी प्रथिने देखील आवश्यक आहेत. वयाच्या ३० व्या वर्षांनंतर शरीराला याची गरज भासते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. पुरुषांनी किमान 55 ग्रॅम आणि महिलांनी 45 ग्रॅम प्रोटीन रोज खावे. आपल्या आहारात अंडी, दूध, कडधान्ये, शेंगा आणि सोयाबीन यासारख्या गोष्टींचा समावेश करा.