रांची :अयोध्या हे प्रभू रामाचे जन्मस्थान असून पौराणिक कथेत त्याला एक शाश्वत सत्य मानले गेले आहे. परंतु प्रभू रामाचे परमभक्त हनुमानांच्या जन्मस्थानाविषयी वेगवेगळे दावे करण्यात येतात. हनुमानाचे जन्मस्थान अंजनी पर्वत असल्याचा उल्लेख रामायणात करण्यात आला आहे. मात्र आता झारखंडमधील गुमला येथील अंजन पर्वतावर त्यांचा जन्म झाल्याचा दावा करण्यात येत आहे. अंजन धाम येथील प्रसिद्ध असलेल्या टेकडीवर हनुमान जयंतीला माता अंजनीच्या कुशीत बसलेल्या बाल हनुमानाची पूजा करण्यात येते.
गुमला जिल्ह्यात आहे अंजन धाम :हनुमान हे भगवान शिवाचे 11 वे रुद्रावतार मानले जातात. त्यांचा जन्म अंजन धाम येथे झाल्याचा दावा भाविकांकडून करण्यात येतो. झारखंडच्या गुमला जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 21 किमी अंतरावर अंजन पर्वत आहे. या पर्वतावर माता अंजनीने हनुमान यांना जन्म दिल्याचे ठिकाण असल्याचा दावा हिंदू धर्मातील अनुयायी करतात. माता अंजनीच्या नावावरून या ठिकाणाला अंजन धाम असे नाव पडले आहे. या पर्वताला अंजनेय असेही म्हणतात. हनुमान माता अंजनीच्या मांडीवर बालकाच्या रूपात विराजमान असल्याचे भारतातील एकमेव मंदिर येथे असल्याचा दावा आचार्य संतोष पाठक यांनी केला आहे.
माता अंजनी होत्या भगवान शिवाच्या परम भक्त :माता अंजनी 365 दिवस वेगवेगळ्या शिवलिंगांची पूजा करत असल्याचा दावा अंजन धामचे पुजारी केदारनाथ पांडे यांनी केला. माता अंजनी भगवान शिवाच्या परम भक्त होत्या असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्या रोज महादेवाला विशेष प्रार्थना करायच्या. त्यांची पूजा करण्याची खास पद्धत असून त्या वर्षातील ३६५ दिवस वेगवेगळ्या शिवलिंगांची पूजा करायच्या. याबाबतचे पुरावे आजही येथे सापडत असल्याचा दावाही त्यांनी केला. काही शिवलिंग आणि तलाव अजूनही त्यांच्या मूळ जागेवर आहेत. अंजन टेकडीवर असलेल्या चक्रधारी मंदिरात दोन रांगेत आठ शिवलिंग आहेत. याला अष्टशंभू म्हणतात. शिवलिंगाच्या वर एक चक्र असून हे चक्र एका जड दगडाचे बनलेले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
किष्किंधा कांडात आहे अंजन पर्वताचा उल्लेख :रामायणातील किष्किंधा कांडात अंजन पर्वताचा उल्लेख आहे. अंजन पर्वताच्या गुहेतच भगवान शंकराच्या कृपेने माता अंजनीने हनुमान यांना जन्म दिला. अंजनपासून 35 किलोमीटर अंतरावर पालकोट आहे. पालकोटमध्ये पंपा सरोवर आहे. पंपा सरोवराशेजारी असलेला पर्वत ऋषिमुख पर्वत आहे. तिथे हनुमान, कपिराज सुग्रीवांचे मंत्री म्हणून राहत असल्याचा रामायणात स्पष्टपणे उल्लेख असल्याचा दावा पांडे यांनी केला आहे. याच अंजन पर्वतावर सुग्रीव श्रीरामांना भेटल्याने हा डोंगर भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. चैत्र महिन्यात येथे रामनवमीपासून विशेष पूजा सुरू होऊन ती महावीर जयंतीपर्यंत चालते. झारखंडसह छत्तीसगड, बिहार, ओडिशा आदी राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक येथे येत असल्याचेही केदारनाथ पांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - Hanuman Jayanti 2023 : महाबली हनुमान आहेत महादेवाचा रुद्रावतार, जाणून घ्या बजरंगबलींच्या बारा नावांची माहिती