हैदराबाद : क्रूसवर छळ करुन मारल्यानंतर प्रभू येशू यांनी गुड फ्रायडेच्या तिसऱ्या दिवशी जन्म घेतल्याची कथा बायबल या ग्रंथात वर्णन करण्यात आली आहे. त्यामुळे गुड फ्रायडेच्या तिसऱ्या दिवसानंतर येणाऱ्या रविवारी ख्रिश्चन बांधव ईस्टर संडे साजरा करतात. देवाच्या पुत्राने पुनर्जन्म घेतल्याचा हा दिवस असल्याचे ख्रिश्चन बांधव मानतात. त्यामुळे जगभरातील ख्रिश्चन बांधव ईस्टर संडे मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात.
काय आहे वधस्तंभावर खिळवल्याचा इतिहास :जेरुसलेम येथील परिसरात प्रभू येशू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करुन नागरिकांना देवाविषयी माहिती देत होते. त्यामुळे त्यांची ख्रिश्चन धर्माबाबतची माहिती नागरिकांना अधिक चांगल्या पद्धतीने समजत होती. मात्र इतर धर्म प्रसारकांना ती आवडत नसल्याने ते प्रभू येशूचा तिरस्कार करत होते, असे म्हटले जाते. प्रभू येशू हे आपण देवाचे पुत्र असल्याचा दावा करत होते. त्यामुळे अनेक धर्म प्रसारकांना त्यांच्याविषयी तिरस्कार झाल्यामुळे त्यांनी प्रभू येशू यांच्याबाबत रोमन गव्हर्नरकडे तक्रार केली. येशू हे धर्म आणि राष्ट्रासाठी धोकादायक असल्याचेही त्यांनी रोमन गव्हर्नरकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले. त्यामुळे येशूंवर देशद्रोहाच्या आरोपावरुन त्यांना सुळावर लटकवून छळ करुन मारण्यात आले.