डॉ. सुजित कुमार भट्टाचार्य हे प्रख्यात चिकित्सक आणि इम्यूनोलॉजी (रोगांपासून संरक्षण कसे करायचे याचा अभ्यास) आणि मायक्रोबायोलॉजी या विषयातील तज्ज्ञ आहेत. तसेच ते इंडीयन काउंन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चचे (आयसीएमआर) माजी अतिरिक्त महासंचालक आहेत. त्याचबरोबर ते नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ कॉलरा अॅन्ड एन्टरिक (आतड्यांसंबंधी) रोग (एनआयसीईडी) या संस्थेचे माजी संचालक देखील आहेत. एचआयव्ही/एड्स, काळा-ताप (ब्लॅक फिव्हर) आणि संसर्गजन्य रोगांमध्ये तज्ज्ञ असलेले भट्टाचार्य हे राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (भारत) सभासद देखील आहेत. जगभर पसरलेल्या कोवीड-१९ साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतचे दीपंकर बोस यांनी डॉ. भट्टाचार्य यांची घेतलेली विशेष मुलाखत...
प्रश्न- ऑक्सफोर्ड विद्यापीठातील संशोधक कोरोना विषाणूवर नवीन लस विकसित करत आहेत. जर ती लस प्रभावी ठरली, तर कोरोना विषाणूच्या संकटातून जगाला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा एक ठोस पर्याय निर्माण होई शकतो. संशोधकांनी आधीच सांगितले आहे की, त्यांच्याकडे सार्स-सीओव्ही -2 चे जीनोम सिक्वेन्स आहेत ज्याचा वापर प्रतिजन(एंटीजन) विकसित करण्यासाठी त्यामध्ये डीएनए तंत्राचा वापर करत आहेत. हा उपक्रम तुम्हाला आशादायक वाटतो का?
होय, ऑक्सफोर्ड विद्यापीठातील संशोधक कोवीड -१९ वर प्रतिकारक लस विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी या अगोदरच दोन निरोगी व्यक्तींवर ह्या लसीचा प्रयोग केला आहे. आता ते लसीकरणाच्या परिणामाची वाट पाहत आहेत. लस विकसित करण्याच्या टप्प्यातली ही पहिली चाचणी आहे. ज्यामध्ये रुग्णाची सुरक्षितता आणि कार्यक्षमता तपासली जाते. पुढील चाचण्यां करण्यासाठी मोठ्या संख्येने स्वयंसेवक तयार आहेत. ही चाचणी ८० टक्के यशस्वी होईल अशी आशा चाचणी समन्वयक (पी.आय.) यांना आहे. एकदा का ही चाचणी यशस्वी झाली की, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर या लसची निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यासाठी भारत हा एक भागीदार देश आहे. ही लस सर्वप्रथम यूकेतील नागरिकांना आणि नंतर उर्वरित जगाला दिली जाईल. त्यासाठी आम्हाला निश्चित आणि स्पष्ट निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
प्रश्न- आयसीएमआरने म्हटले आहे की, भारतात कोवीड -१९ विरुद्ध लढण्याच्या 0सकारात्मकतेचे प्रमाण अंदाजे ४.५ टक्के एवढे आहे. त्यामुळे भारतात कोरोना बाधितांची संख्या कमी व्हायला मदत होत आहे, या विधानाशी तुम्ही सहमत आहात का ?
होय, असहमत असण्याचे काहीही कारण नाही. परंतु, आम्ही निवडलेला नमुना आकार हा एकूण लोकसंख्येचे पुरेसा प्रतिनिधित्व करत आहे की नाही ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी आपल्याला या घटकाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी मांडलेलं गृहितकंच आपला निष्कर्ष किंवा अनुमान ठरवणं धोकादायक ठरु शकते.
प्रश्न- तुम्हाला असे वाटते का ? कि देशभरात अधिकाधिक कोरोना चाचण्या घेतल्या पाहिजेत, विशेषतः खेड्यांमध्ये जिकडे खुप कमी प्रमाणात चाचण्या घेतल्या आहेत. यामुळे कदाचित भारतात कोरोनाची वास्तविक स्थिती समोर येण्यास व्यत्यय येत आहे ?
होय, ते बरोबर आहे. चाचणी किटची उपलब्धता, किटची लोकांना मिळणारी सुविधा, सामाजिक अंतर राखणे या बाबींचा विचार करणे तर गरजेचेच आहे. परंतु देशामध्ये अधिकाधिक चाचण्या घेणेही आवश्यक आहे, यात काहीही शंका नाही. केवळ अशा जास्तीत जास्त चाचण्या घेतल्याने या चाचण्या-आधारित डेटामुळेच देशातील वास्तविक स्थिती समोर येईल.
प्रश्न- अशी माहिती समोर आली आहे की, चीनमधुन आयात केलेले रॅपिड अॅन्टीबॉडी आधारित रक्त तपासणी किटमध्ये काहीतरी खराबी आहे. त्यामुळे आयसीएमआरने त्यातील अनेक किटला नापसंती दर्शवली आहे. तसेच आरटी-पीसीआर पद्धतीने चाचणी केल्यास निकाल यायला बराच कालावधी लागतो, तुम्हाला असे वाटते का कोवीड -१९ रुग्णांची चाचणी करण्यासाठी रॅपिड अॅन्टीबॉडी किट्स व्यतिरिक्त काही इतर पर्याय किंवा उपाय असू शकेल ?
हे पहा, चाचणीचा वापर हा फक्त या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठीचा आणि ट्रेसिंग करण्यासाठी केला आहे. त्यासाठी काही अजून वेगळा उपाय शोधुन काही फायदा होणार नाही, त्यामुळे कोरोना विषाणूवर कायमचा तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे, हे अधिक महत्त्वाचे आहे. आयआयटी-दिल्लीने नुकतीच स्वदेशी चाचणी किट विकसित केली आहे, या बातमीने प्रचंड उत्साह आणि कोरोनाशी लढण्यासाठी उर्जा मिळते. मला आशा आहे की, सर्वांना परवडेल अशा इतर चाचणी किट्स लवकरात लवकर बाजारात येतील. त्यासाठी जगभरात अशा किट्सचे उत्पादन करण्यासाठी प्रचंड संशोधन चालू आहे. कोणत्याही क्षणी याबाबतची आनंददायी बातमी कानावर पडू शकते.
प्रश्न- कोरोना विषाणूशी यशस्वी लढा देण्यासाठी आयसीएमआरला आणि सरकारला तुम्ही काय सल्ला द्याल?
आयसीएमआर ही संस्था भारतातील कोरोना विषाणू विरूद्धच्या लढाईतील पुढच्या फळीतला एक प्रमुख घटक आहे. या संकटकाळी आयसीएमआरसाठी माझ्याकडे काही सूचना आहेत. प्रथम, त्यांना अधिक स्पष्ट आणि निश्चित चाचणी किट विकसित करण्यासाठी योग्य ते प्रोत्साहन द्यायला हवे. सातत्याने विविध प्रयोग आणि प्रभावी उपचार पद्धती विकसित करताना योग्य त्या शिष्टाचाराचाही त्यांनी अवलंब करावा. जास्त उत्साही होऊन चालणार नाही. त्यासाठी आयसीएमआर व्यतिरिक्त इतर बाहेरच्या तज्ज्ञांशी नियमितपणे सल्लामसलत केली पाहिजे. मला खात्री आहे की, आपल्याप्रमाणे जागतिक स्तरावर या विषाणूची प्रतिकूल लस तयार करण्यासाठी मोठ्या संशोधन सुरु आहे. सरकारने आयसीएमआरच्या संशोधनाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवे तसेच हे संशोधन सुरू ठेवण्यासाठी आवश्यक निधीचा पुरवठाही करायला हवा. कोवीड -१९ रूग्णांचे व्यवस्थापन प्रात्यशिके आणि उपचार करण्यातला शिष्टाचार एखादी घोषणा देवून अंमलात आणता येत नाही. भारतासारख्या विस्तीर्ण देशासाठी, आपल्याला पुरेशा प्रशिक्षण मॉडेलसोबतच देशातील प्रत्येक कोपऱ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे, जेणेकरून सामान्य लोकांना याचा फायदा होईल. एका संशोधकाच्या दृष्टिकोनातून मला असे वाटते की, माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी आयजेएमआरमधील उच्च प्रतीचे संशोधन आणि समीक्षापत्रे लोकांसाठी खुली करण्यात यावीत. तसेच 'कोवीड -१९ टास्क फोर्स'ने कोवीड -१९ संबंधित संशोधन करणाऱ्या प्रत्येकाला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन द्यायला हवे.
प्रश्न- बीसीजी आणि हायड्रोक्सीक्लोरोक्विन या दोन्हीच्या वापरामुळे कोरोना विषाणूच्या प्रसारणाच्या तुलनेत कोणतेही निर्णायक परिणाम दिसून आले नाहीत. तुमच्या मते याची काय कारणे असू शकतात?
विशिष्ट प्रतिजना सोबत अतिसंवेदनशील क्रिया होत असताना बीसीजी सारखे औषध या क्रियेमध्ये विलंब करते. बीसीजी हे कोवीड -१९ च्या विरूद्ध उपयुक्त असल्याचा कोणताही पुरावा अजून तरी पुढे आला नाही. हायड्रोक्सीक्लोरोक्वीनमध्ये कार्डियो-टॉक्सिसिटी, क्यूटी आणि धोकादायक एरिथमियास यांचा समावेश असतो. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध कोरोनावर प्रभावी उपाय ठरत नाही, हे समोर आलं आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग शोधावे लागतील. कोरोनावर प्रभावी प्रतिबंधक लस शोधणे हाच एकमेव उपाय असू शकतो.
प्रश्न- दिवसेंदिवस लॉकडाउनच्या कालावधीत वाढ होत आहे. लॉकडाऊन संपल्यावर केवळ ज्येष्ठ नागरिकच असुरक्षित असतील की कोरोनाचा धोका इतर गटालाही असेल ?
कोरोना संक्रमणाचा धोका सर्व प्रकारच्या वयोगटाला आहे. नुकताच कोरोना विषाणुवर मात केलेल्या रुग्णांनाही पून्हा कोरोनाची लागण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. जर, आर्थिक परिणामाचा विचार करुन युरोप आणि अन्य देशांप्रमाणे आपणही लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथील करायला हवे. अचानक लॉकडाउन काढुन घेतले तर याचे देशाला धोकादायक परिणाम भोगावे लागतील. कारण आपल्या देशाची लोकसंख्या इतर देशाच्या तुलनेत खुप जास्त आहे.