नवी दिल्ली :परीक्षेचा कालावधी हा विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबियांसाठीही मोठा कठीण काळ असतो. त्यामुळे विद्यार्थी कायम तणावात असल्याचे दिसून येते. मात्र या काळात विद्यार्थ्यांसाठी झोप घेणे महत्वाचे असते. विद्यार्थ्यांचे माणसिक संतुलन कायम राखण्यासाठी सकस आहार आणि वेळेवर झोप खूप महत्वाचे असल्याचे दिसून आले आहे. तज्ज्ञांच्या मते परिक्षेच्या अगोदर चांगली गाढ झोप घेणे विद्यार्थ्यांच्या हिताचे असते.
विद्यार्थी घेत नाहीत झोप :बहुतेक नागरिक झोपेला आपल्या आरोग्याचा भाग मानत नाहीत. त्यामुळे झोपेला दुय्यम स्थान देण्यात आल्याने त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर पडतो. बहुतेक विद्यार्थी परीक्षेच्या वेळी झोपत नाहीत. त्यानंतर ते मध्यरात्री तेल जाळून त्याचा अभिमान बाळगतात. विद्यार्थ्यांनी अगोदरच्या दिवशीच्या अभ्यासाची उजळणी करणे आवश्यक आहे. शेवटच्या क्षणी विद्यार्थी आपली तयारी करतात. मात्र परीक्षेच्या अगोदरच्या दिवशीच नाही तर परीक्षेच्या १ महिना अगोदर रात्री चांगली झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले चित्त स्थिर ठेऊन जसे अभ्यास करणे गरजेचे आहे, तसेच चांगली झोप घेणेही गरजेचे आहे.
वयावर असतो कालावधी :झोपेचा कालावधी व्यक्तीच्या वयावर अवलंबून असतो. लहान मुलांना जास्त झोप घ्यावी लागते. मात्र सुदृढ शरीरासाठी सरासरी आठ ते नऊ तासांची शांत झोप आवश्यक असते. चांगली झोप शरीरातील हार्मोन्स स्थिर ठेवते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी, इन्सुलिनचे प्रमाण स्थिर राहण्यास मदत होते. त्यासह शरीरातील कोलेस्टेरॉल, लेप्टिन, आणि कोर्टिसोलची पातळीही संतुलित राखल्या जाते. हे संप्रेरक शरीराच्या योग्य कार्यासाठी आवश्यक आहेत. झोपेच्या अभावामुळे लेप्टिन दाबले जाते. त्यामुळे त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतो. व्यक्तीला जास्त भूक आणि तहान लागते. रक्तातील साखरेची पातळी योग्य राखली जात नसल्यामुळे इन्सुलिनची पातळी वाढते. त्यामुळे लवकर मधुमेह होण्याचे प्रमाण वाढते. झोपेच्या कमतरतेमुळे कोर्टिसोलची पातळी वाढून शरीरात जळजळ होते.