यवतमाळ - चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात वणी शहरात गांजा येत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाला मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे त्यांनी वणी पोलिसांच्या मदतीने वरोरा मार्गावर १ लाख ५० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाला आहे.
यवतमाळ येथून मारुती स्विफ्ट कार (एमएच २९ ए.आर ३२०५) या वाहनाने वणी शहरात गांजा आणल्या जात असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळच्या पथकाला मिळाली होती. त्यांनी याबाबत वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांना माहिती दिली. त्यावरून पोलीस उपनिरिशक विजयमाला रिठे, अशोक काकडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, यवतमाळ पथकाचे सैय्यद साजिद आणि इतर पोलिसांनी मिळून वरोरा मार्गावर असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरातील पट्टाचारा नगरमध्ये रात्रीच्या सुमारास सापळा रचला.
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, यवतमाळ थोड्याच वेळात एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार या मार्गावर येऊन थांबली. कारमधून विक्की कैलास धुळे (राहणार, यवतमाळ) हा बॅग घेऊन उतरला असता, पोलिसांनी त्याला अटक केली. यादरम्यान वाहन चालवत असलेला शैलेश राठोड (राहणार, यवतमाळ) हा कार घेऊन वरोराच्या दिशेने फरार झाला. पोलिसांनी बॅगची तपासणी केल्यानंतर ७ पाकिटांमध्ये १ लाख ४५ हजार ४०० रुपये किमतीचा १४ किलो ५४० ग्रॅम गांजा सापडला.
वणी शहरात ठिक-ठिकाणी शालेय विद्यार्थी सिगारेटचे झुरके मारताना दिसून येत आहेत. शहरजवळ असलेल्या निर्जनस्थळी विद्यार्थ्यांची चांगलीच मैफील जमते. शालेय विद्यार्थी व्यसनाच्या विळख्यात येत असल्याची ओरड शहरात होत होती. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशामधून गांजाची तस्करी होत असल्याचे उघड झाले होते. शास्त्रीनगर येथील किराणा दुकानातून पोलिसांनी गांजाही जप्त केला होता. गांजा तस्कर छोट्या छोट्या कागदी पुड्या बांधून युवकांना पुरवत असल्याने विद्यार्थी या व्यसनाच्या आहारी गेले होते. शहरातील एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्याला गांजाचे अतिसेवन केल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.