महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ; काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे जनतेला आवाहन

कोरोनाची लक्षणे आढळताच त्वरीत शासकीय यंत्रणा किंवा आरोग्य विभागाशी संपर्क करावा, जेणेकरून संबंधितांवर वेळेत उपचार करणे शक्य होईल. हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा, असे भावनिक आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

M. D. Singh
जिल्हाधिकारी एम. डी. सिंह

By

Published : Jun 16, 2020, 7:37 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता शहरातून ग्रामीण भागाकडे वाढत चालला आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही अतिशय चिंताजनक बाब आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांनी कोणतीही भीती मनात बाळगू नये. लक्षणे आढळताच त्वरीत शासकीय यंत्रणा किंवा आरोग्य विभागाशी संपर्क करावा, जेणेकरून संबंधितांवर वेळेत उपचार करणे शक्य होईल. हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा, असे भावनिक आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे जनतेला आवाहन

कोरोनाचे संकटाच्या परिस्थितीत संपूर्ण प्रशासन केवळ नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र लढत आहे. त्यामुळे स्वत:हून कोणताही निष्काळजीपणा करू नका. ज्या नागरिकांना श्वसनाचा त्रास, 100 डिग्रीपेक्षा जास्त ताप, नियमित खोकला व सर्दी यासारखी लक्षणे जाणवत आहेत, त्यांनी विलंब न करता जवळच्या कोविड केअर सेंटर आणि कोविड रुग्णालयामध्ये दाखल व्हावे. याबाबत खासगी रुग्णालयात वेळ न घालवता ग्राम स्तरावरील किंवा तालुकास्तरावरील शासकीय यंत्रणेसोबत संपर्क करून रुग्णालयात भरती व्हावे. वरील लक्षणे असल्यास कोणत्याही नागरिकाने स्वत:च्या मर्जीने औषधोपचार करू नये, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

जिल्ह्यात आत्तापर्यंत सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी चार रूग्ण अगदी शेवटच्या क्षणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. दोन जणांना वैद्यकीय महाविद्यालयात आणत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांना या रुग्णांवर उपचाराची संधीच मिळाली नाही. परिणामी मृतांची संख्या वाढली. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 195 वर गेला आहे. यापैकी 146 रूग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून अनेक व्याधींनी ग्रस्त असलेल्या व व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन पॉझिटिव्ह रुग्णांनासुद्धा बरे केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सिंह यांनी केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गेल्यास सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. मास्क आणि सॅनिटायझरचा नियमीत वापर करावा. शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी आपल्या घरीच नियमित 30 मिनिटे व्यायाम, योगा करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी नागरिकांना केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details