यवतमाळ- मित्राच्या आत्महत्येस जबाबदार असल्याच्या संशयावरून एका २७ वर्षीय तरूणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. ही घटना शहरातील अशोक नगर परिसरात घडली असून यातील मारेकऱ्याला तासाभरात शहर पोलीस ठाण्यातील डिबी पथकाने ताब्यात घेतले.
गजानन महादेव शेळके (वय २७ वर्षे, रा. महात्मा फुले चौक) असे मृत तरूणाचे नाव आहे. तर शंकर विश्वनाथ नेवारे (वय २२ वर्षे) असे पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या मारेकऱ्याचे नाव आहे.
दोन महिन्यापूर्वी शंकर नेवारे याचा मित्र निलेश याने गळफास घेवून आत्महत्या केली होती. या आत्महत्येला गजानन शेळके हा जबाबदार असल्याचा राग शंकर नेवारे याच्या मनात होता. तेव्हापासून शंकर हा गजानन शेळके याला मारण्याचा प्रयत्नात होता. अशात शहरातील अशोक नगरात शंकरला गजानन शेळके त्या ठिकाणी दिसला. त्यावेळी दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. दरम्यान, रागाच्या भरात शंकर याने त्याच्याजवळील चाकू काढून गजाननच्या पोटावर सपासप वार केला आणि त्या ठिकाणाहून पळ काढला.
गंभीर जखमी असलेल्या गजाननला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यावेळी गजानन याने शंकरनेच मला मारल्याचे नागतेवाईकांना सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच उपचारादरम्यान गजाननचा मृत्यू झाला. या प्रकरणी सोनू शेळके यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी मारेकरी शंकर नेवारे याच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर शंकर नेवारे याची पोलीस दलातील सर्वच पथकाने शोधमोहिम सुरू केली. अशात शंकर हा लोहारा परिसरातील त्याच्या नोतेवाईकांकडे असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यातील डिबी पथकाला मिळाली. त्यावरून डिबी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोहारा गाठून शंकर नेवारे याला तासाभरातच ताब्यात घेतले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, ठाणेदार धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनाखाली डिबी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक मिलन कोयल, जमादार गजानन क्षिरसागर, रवी आडे, अलताफ शेख, निलेश घोसे, महेश मांगुळकर, राजकुमार कांबळे, अमित मस्के यांच्या पथकाने केली.