यवतमाळ - बाळांतपणासाठी लागणारे रुग्णालयातील कपडे निर्जंतुक नसल्याच्या कारणावरून एका गर्भवती महिलेला वणी ग्रामीण रुग्णालयातून चंद्रपूरला पाठवण्यात आले आहे. हा प्रकार (24 नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास घडला आहे. रंजना नितेश कोल्हे (रा. वारगाव) ही महिला बाळंतपणासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. तिला प्रसवकळा सुरू झाल्याने बाळांतपणाची तयारी करण्यात आली. नैसर्गिकरीत्या बाळांतपण करताना जर शस्त्रक्रियेची गरज पडली तर त्यासाठी लागणारे कपडे अगोदर धुवून निर्जंतूक करावे लागतात. मात्र, या प्रक्रियेसाठी लागणारे कपडेच धुतलेले नसल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे ऐनवेळी तिला ग्रामीण रुग्णालयाने चंद्रपूरला रेफर करण्यात आले.
घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच, शिवसेनेचे शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी वैद्यकीय अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई झाली नाही तर यवतमाळ येथे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा तुराणकर यांनी दिला आहे.