यवतमाळ -घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी (कोपरी) येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना पोलिओचा डोस म्हणून सॅनिटायझर पाजल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी या केंद्रावरील आरोग्य अधिकारी, आशावर्कर, अंगणवाडी सेविका या तिघांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सेवेततून बडतर्फ केले आहे. तर दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
दोन सदस्यीय समिती गठीत -
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी डॉ. ढोले आणि डॉ. पी. एस. चव्हाण अशी दोन सदस्यीय समिती नेमली असून वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मसराम, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तर सीएचओ डॉ. अमोल गावंडे, आशावर्कर संगीता मसराम, अंगणवाडी सेविका सविता पुसनाके यांची सेवा समाप्ती कारवाई आली आहे. चौकशी अहवाल लवकरच येणार असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा -पोलिओची लस देताना एक वर्षाच्या बाळाच्या पोटात गेला सूक्ष्म प्लॅस्टिकचा तुकडा, सोलापूर जिल्ह्यातील घटना
अध्यक्ष, आरोग्य सभापतींनी घेतली भेट
आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कलिंदा पवार आणि आरोग्य सभापती श्रीधर मोहोड यांनी बालकांची भेट घेतली. पोलिओ समजून सॅनिटायझर पाजणे हे हलगर्जीपणाचा कळस आहे. तीन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. दोन वैद्यकीय अधिकारी यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अहवाल येताच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच मुलांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याची माहिती मिळताच तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेतली आणि यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाईचे निर्देश दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे असल्याचे यावेळी सांगितले.