यवतमाळ- जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत. त्यामुळे कामगारांच्या हातचे काम गेले आहे. त्यामुळे देशात अनेक मजुरांची मोठी अडचण झाली आहे. घरापासून शेकडो किलोमीटर अंतरावरील मजुरांची पाऊले आपल्या घराकडे वळली आहेत. घरी पोहोचण्यासाठी वाट्टेल ती जोखीम मजूर पत्करत आहेत. असाच 700 किलोमीटरचा प्रवास करून गुजरातमधून दोन तरुण दारव्हा तालुक्यातील चिकणी गावात कसेबसे पोहोचले. मात्र, गावात आल्यावरही त्यांना घरात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे हाकेच्या अंतरावर असलेल्या गावातील जिल्हा परिषदेचा शाळेत त्यांना मुक्काम करावा लागला आहे. पुढचे 14 दिवस त्यांना शाळेतच क्वारंटाईन होऊन राहावे लागणार आहे.
सुरेश रामकृष्ण रामपूरे (वय 25) आणि विशाल देवीदास मडावी (वय 18) अशी या तरुण मजुरांची नावे आहेत. हे दोघेही रोजगारासाठी गुजरातमध्ये गेले होते. सुरत जिल्ह्यातील नवागाव दिंडोली येथे ते एका रसवंतीमध्ये काम करायचे. मात्र, कोरोनामुळे संचारबंदी लागू झाली आणि रसवंतीचा रोजगार थांबला. आता रोजगारही नाही अन् आश्रयही नाही. म्हणून या दोघांनीही गावाकडे परत येण्याचा निर्णय घेतला. मात्र यायचे कसे? वाहतूक बंद. राज्याचीच काय, जिल्ह्याचीही सीमा ओलांडण्यावर बंदी आहे. शेवटी त्यांनी गुजरात ते दारव्हा प्रवास पायीच करण्याचे ठरविले आणि 31 मार्चच्या रात्री गावाकडे निघाले.