यवतमाळ -निकृष्ट दर्जा असणाऱ्या सिमेंटचा खांब तुटल्यामुळे एका कुटुंबातील दोन चिमुकल्या बहिण भावाचा मृत्यू झाला आहे. ही काळीज पिळवटून लावणारी घटना यवतमाळ जिल्ह्यातील पूसद येथे घटली आहे. तेजस घुक्से (वय 6 महीने) व प्राची घुक्से (वय 9 वर्षे), असे या घटनेत मृत्यू झालेल्या बहिण भावाचे नाव आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुसद येथील महावीर नगर येथे राहणाऱ्या विजय घुक्से या शेतकऱ्याचे लक्ष्मीनगर येथे शेत आहे. त्यांना चार आपत्ये असून याच शेतात विजय घुक्से हे गाजर काढण्याचे काम करत होते तर त्यांची पत्नी सारिका ही तेजस या बाळाला साडीने बांधलेल्या पाळण्याने झोका देत होती. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्राची ही शाळेतून शेतात आली. भूक लागल्याने आईला जेवण देण्याची विनंती केली. तेजसला झोका दे, असे म्हणून आई पाणी आणण्यासाठी घरात गेली. तितक्यात सिमेंटचा निकृष्ट दर्जाचा खांब अचानक तुटून प्राचीच्या डोक्यावर आदळला, त्यामुळे प्राची बेशुद्ध झाली. तर तेजस हा जोरात बाजूला फेकला गेला. आई सारिका ही पाणी घेऊन बाहेर आल्यानंतर संपूर्ण प्रकार पाहताच आरडाओरड केली.