यवतमाळ- भविष्यात कोरोना रुग्णांना विकेंद्रित पद्धतीने आरोग्य सुविधा मिळाव्यात. तसेच, ज्यांना गृहविलगिकरणामध्ये राहण्यासाठी अडचणी आहेत, तसेच अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी ग्रामीण भागात शाळा, वसतिगृहे, मोठी सभागृहे व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी ऑक्सिजन बेडसह मोठ्या प्रमाणात विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. तसेच, सध्याच्या परिस्थितीत रुग्णसंख्या कमी होत आहे, ही दिलासदायक बाब आहे. मात्र, असे असले तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी टेस्टिंग आणि 'ब्रेक द चेन' अंतर्गत अंमलबजावणीत सातत्य राखने आवश्यक आहे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
'पॉझिटिव्हिटी व मृत्युदर कमी करा'
लसीकरणाचे जेवढे डोस आले तेवढे सर्व डोस त्याच दिवशी संपवले पाहिजेत. याची सर्वांनी खात्री करावी. लसीकरणादरम्यान, लसीकरण केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या लसीबाबत डोसनिहाय पूर्वकल्पना आरोग्य विभाग तसेच टास्क फोर्स मार्फत देण्यात यावी. ग्रामस्तरीय समित्यांना सक्रीय करून जनजागृती तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना माहिती द्यावी. 'ब्रेक दि चेन'ची अंमलबजावणी योग्य पद्धतीने सुरू ठेवावी. आपापल्या कार्यक्षेत्रात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढू नये यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.