यवतमाळ - रोहिणी नक्षत्रात काही शेतकरी धुळपेरणी करतात. धूळपेरणी केल्यास उत्पादनात वाढ होते, असे जुने-जाणकार शेतकरी सांगतात. धूळपेरणी केलेल्या पिकावर रोगराईचा प्रादूर्भाव कमी प्रमाणात होतो, अशी मान्यता शेतकऱ्यांमध्ये आहे. मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. धुळपेरणी करणाऱ्यासह अन्य शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. रोहिणीपासून शेतकरी या धुळपेरणीला सुरुवात करतात.
धुळपेरणी केल्यामुळे पिकावर रोगराई येत नाही. पिकाची परीपक्वता लवकर होऊन पिक लवकर म्हणजेच विजयादशमीला हाती येते. पूर्वीच्या काळात धन धान्याच्या राशी घरी आल्यास त्याला सोन्यासारखे महत्व दिले जात होते. म्हणूनच धुळपेरणी करुन दसर्यापूर्वी धान्याच्या राशी घरात आणण्याची प्रथा आहे. यामुळेच शेतकरी धुळपेरणी करतात. खान्देश वगळता मागील दोन दशकापासून बदलत्या नैसर्गिक वातावरणामुळे धुळपेरणीचे प्रमाण इतर ठिकाणी कमी झाले असले तरी विदर्भात धूळ पेरणीने जोर धरला आहे.