यवतमाळ - वेकोली अंतर्गत खासगी कंपनीमध्ये येथील स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा. एकूण कामगारांच्या ८० टक्के कामगार स्थानिक असावे या मागणीकरता शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. कंपनीने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन थांबवण्यात आले. मात्र, स्थानिकांना असेच डावलले तर, हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
वणी तालुक्यातील मुंगोली कोळसा खदान (वेकोली) अंतर्गत येणाऱ्या महालक्ष्मी प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये मनमानी कारभार सुरू आहे. येथील स्थानिकांना डावलून पर राज्यातील लोकांना रोजगार दिला जात आहे. त्यामुळे येथील स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रश्नावर कंपनीने लक्ष द्यावे, स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा, या मागणीकरता शिवसेनेच्या वतीने 'काम बंद आंदोलन' करण्यात आले. तसेच, एकूण कामगारांच्या ८० टक्के कामगार स्थानिक असावे असा पवित्रा घेत शिवसेना आक्रमक झाली होती. या आंदोलनामुळे महालक्ष्मी कंपनीचे काम बऱ्याच वेळापर्यंत बंद होते. २० डिसेंबरपर्यंत स्थानिक रोजगारांना कामावर घेण्याचे आश्वासन कंपनीच्या वतीने देण्यात आल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.