यवतमाळ- राज्याची सूत्रे विदर्भाच्या हातात आहेत. असे असतानाही विदर्भातील प्रश्न सुटलेले नाही. कारखानदारी बंद पडत आहे. बेरोजगारी वाढत असून विकास दर खालावत चालला आहे. या प्रश्नांची सोडवणूक करण्याची कुवत सत्ताधार्यांमध्ये नाही. गुजरातकडून येणार्या सूचनांचेच पालन त्यांना करावयाचे असून केवळ विरोधकांना शिव्या, शाप देण्यातच त्यांचा वेळ जात असल्याचा घणाघात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
राज्यातील प्रश्न सोडविण्याची कुवत सत्ताधार्यांत नाही- शरद पवार
यवतमाळ येथे माजी आमदार संदीप बाजोरीया यांच्या जनसंपर्क कार्यालयात पवारांनी पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसापासून विदर्भ दौर्यावर आहेत.
आज यवतमाळ येथे माजी आमदार संदीप बाजोरीया यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसापासून विदर्भ दौर्यावर आहेत. पुढे बोलताना पवार म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणतात निवडणुकीत समोर कोणताच पैलवान नाही. त्यांच्या पाच वर्षांच्या काळात किती कारखाने बंद झाले. किती रोजगार गेले. आत्महत्येची आकडेवारी जरी दिली तरी त्यांचे कर्तृत्व दिसेल, अशी बोचरी टीका पवारांनी केली. राज्यातील शेतीची स्थिती, बेरोजगारी, कारखानदारी, महागाई, महिला वरील अत्याचार या महत्वाच्या प्रश्नांवर सत्ताधारी बोलत नाहीत. राज्याचा विकास दर खालावला असून सर्वच क्षेत्रात सरकार अपयशी झाल्याची टीका पवार यांनी केली.
सत्ताधार्यांकडून सीबीआय, ईडीचा पुरेपूर वापर
सीबीआय, ईडी सारख्या संस्थानचा वापर सत्ताधार्यांकडून केला जात आहे. सत्तेसाठी गैरवापर हे एकमेव सूत्र सरकारचे असून विरोधात बोलणार्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. साठ वर्षांत काँग्रेस, मित्रपक्षांच्या सरकारने कधीही स्वायत्त असलेल्या संस्थानचा वापर केला नाही. आता मात्र या उलट स्थिती आहे. सत्तेचा गैरवापर किती टोकापर्यंत करायचा यांची कुठलीही मर्यादा राहिली नाही. विरोधात बोलणार्यांना ईडी, सीबीआय अशा संस्थांनाच धाक दाखविणे सुरू आहे. यांचे उदाहरण तुमच्या डोळ्यासमोरच आहे. माझा शिखर बँकेशी कुठलाही संबंध नव्हता, मी साधा संचालकही नव्हतो, असे असतानाही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अशाच पद्धतीने विरोधकांना भीती दाखविल्या जात आहे. सत्तेसाठी काहीही करायचे यातून पुन्हा सत्ता मिळवायची, असे एकमेव धोरण केंद्र शासनाचे असल्याची टीका कुणाचेही नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्यावर पवारांनी केली.
हवाई दलाच्या शौर्याचा राजकीय वापर
‘माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इतिहासच रचला नाही, तर भूगोल तयार केला. त्यांनी कधीही सैन्याचा वापर राजकारणासाठी केला नाही. हल्ली पुलवामा व उरी या ठिकाणी सैन्याने केलेल्या अतुलनीय कामगिरीचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे. असा वापर करणे म्हणजे भारतीय सैन्यावर अविश्वास दाखविल्यासारखे होईल’, असे मत पवार यांनी व्यक्त केले. भारतीय सैन्यांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. प्रत्येक भारतीयांना त्यांचा अभिमान आहे. पुलवामा व बालाकोट हल्ल्यानंतर आम्ही सर्वपक्षीय नेत्यांनी सरकार व भारतीय सैन्य जी कारवाई करेल, त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले होते. मात्र, कालांतराने भारतीय सैन्यांनी केलेल्या शौर्याचा वापर राजकारणासाठी करणे सुरू झाले, हे योग्य नाही, असे म्हणत पवार यांनी सत्ताधारी केंद्रीय नेतृत्वावर टीका केली. हे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने असे मुद्दे राजकारणात वापर करणे अत्यंत चुकीचे असल्याचेही पवार म्हणाले.
गडकरींच्या कामांची पवारांकडून स्तुती
नितीन गडकरी यांनी नागपूर आणि परिसरात केलेली कामेच केवळ दिसतात. इतर कुठलेही काम केंद्र किंवा राज्य शासनाने केले असे दिसत नाही, असे म्हणत पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामांची स्तुती केली. मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री विदर्भातील आहे. दोन महत्त्वाची खाती विदर्भात असतानाही विदर्भातील रस्त्यांची स्थिती चिंताजनक आहे. यामुळे ‘खड्डेयुक्त रस्ता‘ असे धोरण सरकारचे असावे, अशी शंका कुणाच्याही मनात आल्याशिवाय राहत नाही. शहरातील अंतर्गत रस्त्यांची स्थिती तर अत्यंत खराब आहे. दोन दिवसापासून मी विदर्भ दौर्यावर असून प्रत्येक जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती अशीच आहे. याला सरकारचे धोरण जबाबदार असल्याची टीका पवार यांनी केली.
तरुण पिढीला हवाय बदल
गुजरातचे आदेश पाळायचे, त्यांच्या सोईचे निर्णय घ्यायचे, असा सपाटा राज्यशासनाने लावला आहे. याचा परिणाम राज्यातील रोजगारावर झाला आहे. बेरोजगारी, महागाई, शेतीचे प्रश्न वाढत असल्याने तरुण वर्गात मोठा असंतोष दिसत असून तरुण पिढीला बदल हवाय असेच चित्र सध्या राज्यात दिसत असल्याचे पवार म्हणाले. गुजरात गुंतवणूक करण्यात कसे सोईचे आहे, असे चित्र केंद्राकडून भासवले जात आहे. अहमदाबाद-मुंबई या बुलेट ट्रेनची मागणी कुणीही केली नसताना हा प्रकल्प हाती घेण्यात आला. यापेक्षा दिल्ली-मुंबई-नागपूर असा प्रकल्प हाती घेतला असता तर विदर्भ, मराठवाडा अशा राज्यातील सर्वच भागाला त्यांचा लाभ मिळाला असता. रोजगारनिर्मिती झाली असती. मात्र, सत्ताधार्यांना तसे करायचे आहे असे दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या काळात सुरू झालेले कारखाने या सरकारच्या काळात बंद पडले आहेत. जे सुरू आहे त्यातील कामगार काढले जात आहे. राज्य आणि देशाला संकटात नेणार्यांना सत्ताधार्यांना खाली खेचू. यात आम्हाला युवकांची मोठी साथ मिळत असून युवकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्यांना तरुण पिढी जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे पवार म्हणाले.