यवतमाळ - विदर्भाची जमीन कसदार आहे. या जमिनीला पुरेसे पाणी मिळाले तर येथे सोने उगवण्याची ताकद विदर्भातील शेतकऱ्यांच्या मनगटात आहे. विदर्भाच्या विकासासाठी येथे उद्योग उभारलेच पाहिजेत मात्र, त्यासोबत विदर्भात जलसिंचनाचे प्रमाण वाढविले तर विदर्भाचे सोने होईल. त्यामुळे विदर्भात जलसिंचन वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
जलसिंचन वाढवल्यास विदर्भाचे सोने होईल - रामदास आठवले
जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील सांब या गावात खोल विहिरीत पाण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या बंजारा महिलांना पाहिल्यानंतर त्या विहिरीजवळ आठवलेंनी दुष्काळग्रस्त महिलांची भेट घेतली.
शुक्रवार १० मे पासून रामदास आठवले यांनी ३ दिवसांच्या दुष्काळी दौऱ्याला नागपूर येथून सुरुवात केली. नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील टंचाईग्रस्त गावांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी आठवले यांच्या समवेत रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुपेश थुलकर, सुधाकर तायडे, मोहन भोयर, आर एस वानखडे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर उपस्थित होते.
यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्तांना भेटून चर्चा केली. त्यांचे प्रश्न जाणून घेतले. जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील सांब या गावात खोल विहिरीत पाण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या बंजारा महिलांना पाहिल्यानंतर त्या विहिरीजवळ आठवलेंनी दुष्काळग्रस्त महिलांची भेट घेतली. यावेळी गावातील बचतगटांच्या महिलांनी दुष्काळ निवारणासाठी विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पाझर तलाव, प्रश्नी तसेच पाणीबिल माफ करण्यासह विवीध मागण्यांचे निवेदन गावकऱ्यांनी दिले. या गावात सभागृह बांधण्याची मागणी केली. त्यासाठी खासदार निधीतून निधी देण्याची मागणी करण्यात आली. सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे तसेच दुष्काळाच्या निवारणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दुष्काळी दौऱ्यातील अहवाल देऊन दुष्काळग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन ना रामदास आठवलेंनी दिले. विदर्भातील दौरा केल्यानंतर ते उद्या मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबादचा दौरा करून तिसऱ्या दिवशी ते सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी गावांचा दौरा करणार आहेत.
वीरमरण आलेल्या अग्रमान रहाटे यांच्या परिवाराला 5 लाखाची मदत
दौरा दरम्यान तरोडा गावातील वीरमरण आलेल्या अग्रमान रहाटे यांच्या कुटुंबियांची निवासस्थानी जाऊन आठवलेंनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी रिपब्लिकन पक्षातर्फे रहाटे परिवाराला सांत्वनपर मदत म्हणून ५ लाख रुपये देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.