यवतमाळ Protest for Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांच्या अटकेच्या निषेधार्थ यवतमाळच्या मारेगावात मोर्चा काढण्यात आलाय. मारेगाव, झरी जामणी व वनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंध्र प्रदेशचे शेतकरी शेती करण्यासाठी वास्तव्याला आहेत. या शेतकऱ्यांनी चंद्राबाबू नायडूंच्या अटकेच्या निषेधार्थ सभा घेऊन मारेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. चंद्राबाबू नायडूंना खोट्या आरोपाखाली व चुकीच्या पद्धतीनं अटक केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केलाय.
500 हून अधिक शेतकऱ्यांचे आंदोलन : चंद्रबाबू नायडू यांना पाठिंबा देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील ५०० हून अधिक शेतकऱ्यांनी मारेगावात आज आंदोलन केलय. यावेळी आंदोलकांनी तहसील कार्यालयावर मोर्चाही काढलाय. चंद्रबाबू नायडू हे सध्या आंध्र प्रदेशातील राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत. अटकेच्या वेळी त्यांच्या समर्थकांनी जोरदार प्रदर्शन करत अटकेला विरोध केला होता. आता त्यांची सुटका होईपर्यंत विविध ठिकाणी उपोषणं व आंदोलनं सुरू राहणार असल्याचं त्यांच्या समर्थकांनी सांगितलंय. चंद्रबाबू नायडू यांच्या समर्थकांनी तेलंगाणामधील विविध शहरांमध्ये आंदोलन केलं. नायडू यांना केलेल्या अटकेचा तीव्र निषेध टीडीपी कार्यकर्त्यांनी यावेळी केला. हैदराबादमधील वनस्थलीपुरम येथं निदर्शनं करण्यात आली. यामध्ये बीआरएस आमदार सुधीर रेड्डी यांच्यासह सुमारे २५० कार्यकर्ते सहभागी झाले होते.