यवतमाळ - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. त्यातच रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना जेवण देण्यासाठी प्रतिसाद फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. भुकेल्यांच्या पोटात अन्नाचे दोन घास पडावे, यासाठी तरुणांची फौज रात्रंदिवस झटत आहेत.
कोरोनाच्या संकटात 'प्रतिसाद' फाउंडेशनची मानससेवा, रात्रंदिवस झटतेय तरुणांची फौज
संकट काळात मदतीला धावून जाणे, हीच खरी मानवसेवा. आपण पोटभर जेवण करून निवांत झोपी जात असताना शेजारी कुणी उपाशी राहू नये, हे चित्र धूसर होत चालले आहे. मात्र, कोरोना विषाणू महामारीच्या संकटात माणसातला माणूस एकदा परत जिवंत झाल्याचे आशादायी चित्र सर्वत्र दिसत आहे.
सुरुवातील २०० गरजूंना जेवण पुरवण्यात येत होते. मात्र, आता डब्यांची संख्या १२०० च्या घरात पोहोचली आहे. प्रतिसादच्या कार्याची ओळख असल्याने नागरिकही आपल्या घरी बनविलेले जेवण त्यांच्या कार्यालयात आणून देतात. मजूरवर्ग पायी प्रवास करीत आपले गाव जवळ करीत आहेत. यवतमाळातून रात्री जाणार्या मजुरांचा शोध घेऊन त्यांना जेवण देऊन त्यांचा पुढील प्रवास सुकर करत आहेत. त्यांच्या या कार्यात समाजातील दानशुरांनीही आपला खारीचा वाटा उचलला आहे. दोन हजार गरजूंना तांदूळ, पीठ, तेल, डाळ, मीठ, मिरची आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
शहरामधील रस्त्यावर फिरणारे जवळपास साठ मानसीक रुग्ण व भीक मागून जीवन जगणार्या लोकांना दररोज जेवणाचे डब्बे पोहोचविण्यात येत आहेत. शासकीय रुग्णालयात प्रतिसादचे वीसपेक्षा जास्त सदस्य जेवण व इतर कार्यात मदत करीत आहेत.