यवतमाळ - सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डीझेलच्या दारात उच्चांकी वाढ झाली आहे. पेट्रोल 101 रुपये 55 पैसे, तर डीझेल 92 रुपये 10 पैसे प्रति लिटर झाले आहे. या पेट्रोल दरवाढिचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकरी सध्या खरीप हंगामातील कामात व्यस्त आहेत. त्यांना बियाणे आणि खते खरेदी करावे लागत आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च मोठया प्रमाणात वाढला आहे. त्याचा अतिरिक्त भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
सर्व-सामन्यांना आर्थिक भुर्दंड
पेट्रोल आणि डिझेलमध्ये सातत्याने दरवाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असतानांच केंद्र सरकार मात्र, दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून त्यांची गळचेपी करत आहे. 1 एप्रिल 2020 ला पेट्रोलचे भाव प्रती लिटर 77.53 रुपये तर डिझेलचे भाव हे 66.42 रुपये इतके होते. याचाच अर्थ गेल्या 13 महिन्याच्या कोरोना काळात केंद्र शासनाने पेट्रोलचे भाव 24 रुपये आणि डिझेलचे भाव 26 रुपये इतके वाढविले आहे. कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावल्या गेले आहेत. अशा स्थितीत केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेलची ज्या पद्धतीने दरवाढ केली आहे, ही क्रूर थट्टाच म्हणावी लागेल.
हेही वाचा -मुंबईत पेट्रोल फक्त ३५.६७ रुपये प्रतिलीटर, राज्य आणि केंद्राने कर काढला तर हे शक्य...