यवतमाळ- जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संघटना एकवटल्या असून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा सोडावा, अशी एकमुखी मागणी त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात एकवटल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संघटना
जिल्हाधिकाऱ्यांना हटवा अशी मागणी करत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संघटनांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले असून तहसीलदार, बीडीओ, नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यासह 12 विविध संघटना, जिल्हा परिषदेचे अधिकारी आदींनी मोर्चा काढून आंदोलन स्थळी भेट दिली. जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.
जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यानंतर आरोग्य विभागाच्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना हटवा, अशी मागणी करत त्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला महसूल अधिकाऱ्यांनीही पाठिंबा दर्शविला असून तहसीलदार, बीडीओ, नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यासह 12 विविध संघटना, जिल्हा परिषदेचे अधिकारी आदींनी मोर्चा काढून आंदोलनस्थळी भेट दिली. याठिकाणी जिल्हाधिकारी सिंह यांच्या वर्तणुकीबाबत निषेध नोंदविण्यात आला. जिल्हाधिकारी तानाशाही करीत आहेत, असभ्य, अशासकीय भाषेत ते अधिकाऱ्यांना वारंवार अपमानित करतात, तोडफोडीची भाषा वापरतात. कायद्याचा धाक दाखवून निलंबित करण्याची धमकी देतात. त्यामुळे त्यांची ही बिहारी पद्धतीची भाषा यापुढे चालणार नाही. त्यांची बदली होईस्तोवर आंदोलन सुरू राहील. जिल्हाधिकाऱ्यांनी आता हा जिल्हा सोडावा, अशी मागणी अधिकाऱ्यांच्या संघटनांनी केली आहे.