यवतमाळ- यवतमाळ-आर्णी मार्गावरील वडगाव मोक्षधामाजवळ दुभाजक ओलांडताना विजेच्या खांबाला धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कंत्राटदराने दुभाजकांमध्ये लावण्यात येणाऱ्या लाईटसाठीच्या जिवंत विद्युत तारा न बुजवता उघड्यवारच ठेवल्यामुळे, ही घटना घडली आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे.
यवतमाळमध्ये विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू - यवतमाळ
यवतमाळ-आर्णी मार्गावरील वडगाव मोक्षधामाजवळ दुभाजक ओलांडताना विजेच्या खांबाला धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मोहन कृष्णराव कावरे(वय ३८, रा. शांतीनगर, वडगाव) असे वीजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आर्णी मार्गावरील दुभाजकांमध्ये पथदिवे लावण्याचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. यासाठी विद्युत तार टाकण्यात आली आहे. मात्र, ही जिवंत विद्युत तार दुभाजकांमध्ये मोकळी असल्यामुळे दुभाजक ओलांडतांना मोहन कावरे याना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या मार्गावर आतापर्यंत, अशा प्रकारच्या ३ घटना घडल्या आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याने संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करून मृताच्या नातेवाईकांना मदत करण्यात यावी, अशी मागणी वडगाव ग्रामस्थांनी केली आहे.