महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

२४ खिशात २४ बाटल्या..! यवतमाळमध्ये दारू तस्करीसाठी खास जॅकेट

रविवारी राळेगाव पोलिसांनी अनोख्या पद्धतीने दारुची तस्करी करताना एका व्यक्तीला अटक केली आहे. शर्टच्या आत जॅकेटमध्ये पॉकेट तयार करून हा व्यक्ती देशी दारुच्या बाटल्यांची तस्करी करत होता.

२४ खिशात २४ बाटल्या..! यवतमाळमध्ये दारू तस्करीसाठी खास जॅकेट

By

Published : Apr 21, 2019, 5:44 PM IST

यवतमाळ- दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूचा पुरवठा करण्यासाठी राळेगाव, कळंब, वडकी ही शहरे आघाडीवर असल्याचे बोलले जाते. असे असताना राळेगाव हे वर्धा जिल्ह्यासाठी दारू तस्करीचे केंद्र बनल्याचे समोर आले आहे. रविवारी राळेगाव पोलिसांनी अनोख्या पद्धतीने दारुची तस्करी करताना एका व्यक्तीला अटक केली आहे. शर्टच्या आत जॅकेटमध्ये पॉकेट तयार करून हा व्यक्ती देशी दारुच्या बाटल्यांची तस्करी करत होता.

२४ खिशात २४ बाटल्या..! यवतमाळमध्ये दारू तस्करीसाठी खास जॅकेट

ज्ञानेश्वर पिसे (५२, टाकळी दरणे, जि. वर्धा) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याने कळंब येथून अंदाजे किंमत १२५० रुपयांच्या देशी दारूच्या २४ बाटल्या विकत घेतल्या होत्या. त्या शर्टच्या आत असलेल्या जॅकेटमध्ये टाकून तो राळेगाव बस स्थानकावर आला होता. राळेगाव येथून वर्धा येथे बसमध्ये चढत असताना त्याला पोलिसांनी रंगेहात अटक केली.

दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये दारूचा पुरवठा करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल वापरण्यात येत आहेत. दारूचा पुरवठा करण्यासाठी शर्टच्या आत एक जॅकेट तयार करण्यात आले असून नेहमी याच पद्धतीने दारू तस्करी करत असल्याचे आरोपीने सांगितले आहे. स्थानिक पोलीस विभागाकडून दारूच्या तस्करीला मिळणारे अभय सर्वश्रृत आहे. त्यामुळे यामागील मुख्य सूत्रधारास पोलिसांकडून अभय दिले जात असल्याचे बोलले जात आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज गिरी, हरीश धुर्वे, प्रमोद डडमल, प्रवीण खंडारे यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details