महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार; नाईक लवकरच शिवसेनेच्या तंबूत दाखल होणार - मनोहर नाईक

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या आमदर मनोहर नाईक यांच्या पुसद विधानसभा मतदारसंघात समर्थकांची सहविचार सभा पार पडली. आता जनतेने ययाती व इंद्रनील या दोन्ही पुत्रांना सांभाळून घ्यावे, अशी भावनिक साद मनोहर नाईकांनी घातली.

यवतमाळ

By

Published : Jul 29, 2019, 9:58 PM IST

यवतमाळ- विदर्भामध्ये पुसद विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव गड राहिलेला आहे. नाईक घराण्याचा शिवसेनेत प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या गडाला खिंडार पडणार आहे. मनोहर नाईक आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार; नाईक लवकरच शिवसेनेच्या तंबूत दाखल होणार

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या आमदर मनोहर नाईक यांच्या पुसद विधानसभा मतदारसंघात समर्थकांची सहविचार सभा पार पडली. आता जनतेने ययाती व इंद्रनील या दोन्ही पुत्रांना सांभाळून घ्यावे, अशी भावनिक साद मनोहर नाईकांनी घातली. जनतेने स्व. वसंतराव व सुधाकरराव नाईकांसह मला जे प्रेम दिले ते प्रेम दोन्ही मुले ययाती व इंद्रनील यांना द्या, असे आवाहन करतानाच वय झाले असले तरी आपण राजकारणातून निवृत्ती घेणार नाही, जनतेची कामे करत राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षाबद्दलचा निर्णय घेत असताना मतदारसंघात आणखी मते जाणून घेऊ व लवकरच निर्णय जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मनोहर नाईकांचे कनिष्ठ पुत्र इंद्रनील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०१४च्या निवडणुकीवेळी अपमानास्पद वागणूक मिळाली असल्याचे सांगत लवकरच शिवसेना प्रवेशाचे संकेत दिले. तर, नाईक समर्थकांनी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्यावर आगपाखड करत बाजोरियांमुळेच नाईकांची पक्षात हेळसांड झाल्याचा आरोप केला.

या सहविचार सभेला राष्ट्रवादीचे १० जिल्हा परिषद सदस्य, मनोहर नाईक यांच्या पत्नी पुसद नगराध्यक्ष अनिता नाईक, सर्व नगरसेवक व सहकार क्षेत्रातील नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नाईकांनी राष्ट्रवादी सोडण्याची भूमिका घेतल्याने पुसदसह यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.

शिवसेनेला आधी वसंतसेना म्हणून ओळखायचे, त्यामुळे सेनेत जाणे काही चुकीचे नाही. या निर्णयाला सहमती असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी नोंदवल्या.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांच्या कारकिर्दीत शिवसेनेला उभारी मिळाली होती. आता सहा दशकांनंतर वसंतराव नाईक यांचे नातू इंद्रनील नाईक व राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री मनोहर नाईक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून नाईक घराण्याचे वर्चस्व पुसदमध्ये राहिलेले आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक आणि त्यानंतर आता मनोहर नाईकही सगळीच मंडळी काँग्रेस विचार सरणीची होती. मात्र, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तेव्हा सुधाकर नाईक पवारांसोबत गेले. तेव्हापासून नाईक घराणे राष्ट्रवादीमध्येच होते. पुसद विभागावर नाईक घराण्याचे वर्चस्व आहे. त्यामुळेच पुसद हा राष्ट्रवादीचा विदर्भातील बालेकिल्ला होता. आता नाईकच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करत असल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details