यवतमाळ - राळेगाव कृषी विभागाच्या अनागोंदी कारभाराचे किस्से चांगलेच गाजत आहे. या आधीही तहसीलदार यांच्या कक्षात तालुका कृषी विभागाच्या तुघलकी कारभारावर खास बैठक लावून समज देण्यात आली होती. मात्र, स्थिती बदलली नाही. मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात पिकाचे पंचनामे करा या मागणीसाठी मनसे पदाधिकारी कृषी विभागात दाखल झाले. याठिकाणी कुणीच उपस्थित नसल्याने मनसेच्या वतीने या भोंगळ कारभाराचा निषेध करून कृषी अधिकारी यांच्या खुर्चीला सडलेली कपाशी बोंड व सडलेल्या सोयाबीनचा हार घालण्यात आला. मनसेच्या आक्रमक पदाधिकारी यांनी ही बाब तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिली.
कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला सडलेल्या बोंडाची भेट - राळेगाव तहसील कार्यालय
मनसेच्या वतीने या भोंगळ कारभाराचा निषेध करून कृषी अधिकारी यांच्या खुर्चीला सडलेली कपाशी बोंड व सडलेल्या सोयाबीनचा हार घालण्यात आला. मनसेच्या आक्रमक पदाधिकारी यांनी ही बाब तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिली.
राळेगाव तालुक्यात पावसामुळे शेतातील पिके खराब होऊन शेतकऱ्यांच्या कपाशी व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास पंधराशे हेक्टर वरील पिके पाण्यामुळे खराब झाले. यासंदर्भात शेतकऱ्यांनी अनेक वेळा निवेदने देवुन सुद्धा तालुका कृषी अधिकारी आपले वातानुकूलित कार्यालय न सोडता अद्याप शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. त्यामुळे आक्रमक भुमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला सडलेल्या कपाशीच्या बोंडाचा हार घालुन निषेध केला व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला. यावेळी शैलेश आडे,आरिफ शेख, सुरज लेनगुरे, संदीप गुरनुले,राहुल गोबाडे यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.