यवतमाळ - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केले आहेत. या संदर्भात मागील दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. सोमवारी (दि. 20 सप्टेंबर) आमदार सुधीर मुनगंटीवार हे यवतमाळ खासगी दौऱ्यावर आले असता त्यांनी या प्रकरणावर ती आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते किरीट सोमैया भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत तर राज्यातील गृह विभाग काय करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये सोमैयांना गृहमंत्री म्हणून घ्यावे
जर भाजपच्या साखर कारखानदारांचे घोटाळे असतील तर मंत्री म्हणून ते घोटाळे उघड करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. भ्रष्टाचार उकरुन काढण्याचा काम मंत्री, गृह विभागाचे आहे. मात्र, सोमैया भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकारने सोमैया यांना आपल्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून घ्यावे घोटाळे काढण्याचा अधिकार तरी प्राप्त होईल. सरकार तुमचे आहे व चौकशी किरीट सोमैया करणार का, असा प्रश्नही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.