यवतमाळ- दोन दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास दीडशे हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. यात सोयाबीन, कापूस तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेतकऱ्यांवर अस्मानी संकट; जिल्ह्यातील दीडशे एकर जमीन पाण्याखाली, नुकसान भरपाईची मागणी - मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका
जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसाने जवळपास दीडशे हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. यात सोयाबीन, कापूस तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बाभूळगाव, कळंब, राळेगाव, महागाव, उमरखेड आर्णी यासह इतर तालुक्यातील कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. तर त्यानंतर पावसाने चांगलीच उसंत घेतली. मागील दोन दिवसापासून पावसाने पुन्हा जोर धरला. जिल्ह्यातील बाभूळगाव, कळंब, राळेगाव, महागाव, उमरखेड आर्णी यासह इतर तालुक्यातील कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. पावसामुळे नागपूर -तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले तरी, ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून हा महामार्ग गेला. त्या महामार्गाच्या रस्त्यालगतचे नालीचे काम संबंधित कंपनीने पूर्ण केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी जाण्यास मोठी अडचण निर्माण झाली. परिणामी शेतात तलाव साचल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
आधीच लॉकडाउन काळात शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला नाही. कसेबसे पिकांची लागवड केली असता, आता शेतामध्ये तलाव भरल्यासारखी स्थिती झाली. रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाण्यासाठी संबंधित कंपन्यांनी ही कामे तातडीने करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.