यवतमाळ- जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर आधारीत आहे. निसर्ग, पाणी आदी गोष्टी आपल्या हाती नसल्या तरी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यावर कृषी विभागाचा भर असला पाहिजे. खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने तात्काळ करावे, अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार ख्वाजा बेग, आमदार मनोहर नाईक, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.
कृषी विभाग हा गावस्तरावरील शेतकऱ्यांपर्यंत पोहचणारा घटक आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, कृषी विभागाच्या योजना केवळ कागदावर ठेवू नका. शेतकऱयांना हंगामात बियाणे व खतांची कमतरता जाणवणार नाही, याची काळजी घ्या. माती परिक्षणासंदर्भात जमिनीचा पोत पाहून शेतकऱयांना मार्गदर्शन करा. जलयुक्त शिवार, धडक सिंचन, शेततळ्यांमुळे शेतकऱयांना लाभ झाला आहे. या गोष्टींमध्ये सातत्य ठेवण्यासाठी कृषी विभागाने अधिक जोमाने काम करावे. पीक विमा योजनेत सर्व शेतकऱयांना सहभागी करण्याचे प्रयत्न करा असेही ते म्हणाले.