महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

maharashtra rain : गारांसह पाऊस, यवतमाळात ओलांडली सरासरी

जिल्ह्यात सरासरीच्या 102 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात साधारणपणे 674 मिलिमीटर पाऊस होतो. मात्र या तीन महिन्यात यावर्षी 779 मिलिमीटर सरासरी पाऊस कोसळला.

By

Published : Sep 7, 2021, 8:38 PM IST

Updated : Sep 7, 2021, 8:56 PM IST

यवतमाळ -जिल्ह्यात काल सायंकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. सप्टेंबरमध्ये जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली. जिल्ह्यात सरासरीच्या 102 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात कहर केला. अक्षरशः पावसाने झोडपून काढले.

वीजपुरवठा खंडित

यवतमाळ -पांढरकवडा, नेर, पुसद या परिसरात एवढा पाऊस पडला, की शेतात पाण्याचे डबके साचले होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने पांढरकवडा मार्गावरील जोडमोहा गावाजवळ रस्त्यावर मोठी-मोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नेर तालुक्यातील वाई हातोला, पिंपरी कलगा, आनंदनगर, टाकळी सलामी या भागात पावसादरम्यान गारपीट झाली. पावसाच्या दरम्यान शहरातील वीजपुरवठा खंडित झाला.

पीकांचे नुकसान

जून ते ऑगस्ट या तीन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात साधारणपणे 674 मिलिमीटर पाऊस होतो. मात्र या तीन महिन्यात यावर्षी 779 मिलिमीटर सरासरी पाऊस कोसळला. या तीन महिन्याच्या सरासरी पावसाच्या तुलनेत 115.5 टक्के इतका होता. नऊ तालुक्यातील शंभर टक्क्यांहून जास्त पाऊस पडला. यात बाभूळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, उमरखेड, महागाव, झरीजामनी या तालुक्याचा समावेश आहे. तर राळेगाव, पुसद, उमरखेड, दिग्रस, बाभूळगाव, नेर, पांढरकवडा आणि यवतमाळ या तालुक्यात 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद या शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 324 हेक्टर पिकांच्या नुकसानीचा आकडा असला तरी प्रत्यक्षात नुकसान 700 हेक्टरवर असण्याची शक्यता आहे.

अरुणावती धरणाचे 7 दरवाजे उघडले

दिग्रस येथील अरुणावती धरणाचे आज सकाळी सात दरवाजे उघडण्यात आले. अरुणावती धरणात ९७.८७ टक्के एवढा जलसाठा आहे. पातळी कायम ठेवण्यासाठी प्रती सेकंद २०३ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अरुणावती धरण परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

पाणीपातळी वाढली

धरणाच्या ११ दरवाज्यापैकी १, ११, ६, ५, ७, ४ आणि ८ क्रमांकाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून अरुणावती धरण परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पातळी सप्टेंबरमध्ये 90 टक्क्याच्या वर गेल्याने सकाळपासून धरणाच्या 11 दरवाज्यांपैकी सात दरवाजे उघडण्यात आले. काल रात्रीपासून पुसद, दिग्रस या भागात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे अरुणावती प्रकल्पाची पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे पातळी योग्य ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हे दरवाजे उघडण्याचे निर्देश दिले.

दोन युवक गेले वाहून

महागाव तालुक्यातील काळी (दौ.) ते दिग्रस मार्गावर वसंतनगर येथील पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी काढण्याचा नादात दोन युवक वाहून गेल्याची घटना उघडकीस आली. ज्ञानेश्वर जाधव (२८), सुरेश महिंद्रे (२७) अशी वाहून गेलेल्या दोन युवकांची नावे आहेत. ते महागाव तालुक्यातील साई ईजारा गावचे रहिवासी आहेत. पावसामुळे वसंतनगर येथील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. त्या पाण्यातून दुचाकी (एमएच 29 एव्ही 0074) काढण्याचा या दोघांनी प्रयत्न केला होता. दरम्यान पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोन्ही युवक वाहून गेले. याबाबत दिग्रस पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांना माहिती मिळताच त्यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी रवाना झाले. यापैकी ज्ञानेश्वर जाधव यांचा मृतदेह मिळाला. मात्र सुरेश महिंद्रे याचा मृतदेह मिळाला नाही. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोधकार्य अजूनही सुरू आहे.

बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग

24 तासांपासून संततधार असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात झाली. सद्यस्थितीत या धरणात एकूण साठवण क्षमतेच्या 85 टक्के पाणीसाठा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यधिकारी यांनी पाण्याचा विसर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे आज बेंबला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांनी चौदा दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडले आहेत. त्यामुळे धरणातून 742 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे बाभुळगाव, कळंब, राळेगाव आणि मारेगाव तालुक्यातील नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Last Updated : Sep 7, 2021, 8:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details