यवतमाळ -परतीचा पाऊस सुरू असल्याने पिकांची सुरक्षा करण्यासाठी शेतकरी बाजारपेठेत ताडपत्री खरेदी करण्यासाठी जात आहे. मात्र, ताडपत्री म्हणून शेतकऱ्यांना हलक्या दर्जाचे प्लास्टिक ताडपत्री म्हणून विकण्यात येत आहे. इतकेच नव्हे, तर जी ताडपत्री 600 रुपयांची मिळत होती, तीच आता 1300 रुपयांवर गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लुबाडणूक होत आहे.
ताडपत्री म्हणून हलक्या दर्जाचे प्लास्टिक शेतकऱ्यांच्या माथी - यवतमाळ प्लास्टिक बातमी
ताडपत्री म्हणून शेतकऱ्यांना हलक्या दर्जाचे प्लास्टिक चढ्याभावाने विकण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असून पिकांची सुरक्षा होण्याऐवजी नुकसान अधिक होत आहे.
जिल्ह्यात सोयाबीन काढणीला वेग आला आहे. अशातच मागील आठवडाभरापासून पावसाने जोर धरला आहे. कुठे सोयाबीनची गंजी, तर कुठे सोंगनी केलेले सोयाबीनचे ढीग शेतात पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीन काढून गंजी लावून ठेवली आहे. पावसामुळे सोयाबीन भिजण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी ताडपत्रीने झाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. बाजारात गेल्यास किलोने मिळणारे प्लास्टिक मीटरच्या भावाने शेतकऱ्यांना विक्री केले जात आहे. हे प्लास्टिक पिकांवर झाकल्यास त्यातून आत पाणी झिरपते. त्यामुळे पिकांची सुरक्षा होण्याऐवजी नुकसान अधिक होत आहे.