यवतमाळ - गणपती विसर्जनासाठी गेलेल्या गणेश भक्तांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांचा हा हल्ला ध्यानीमनी नसल्याने गणेश भक्तांची चांगलीच तारांबळ उडाली. यात 15 ते 16 गणेश भक्तांना मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांना मारेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली.
तालुक्यातील सालेभट्टी येथे काही घरी दरवर्षी प्रमाणे गणपती स्थापना करण्यात आली होती. आज सप्टेंबरला विसर्जनासाठी नेहमीच्या ठिकाणी तलावावर न जाता गावातीलच बळीराम लोणसावळे यांच्या शेतामध्ये असलेल्या शेततळ्यामध्ये गणपतींच्या विसर्जनासाठी गेले. यांच्या शेतामध्येच मोहाचे एक मोठे झाड आहेत. याच झाडावर आग्या मोहोळ बसलेले होते.
गणपती विसर्जनासाठी गेलेल्या कोणालाही याची यत्किंचितही कल्पना नव्हती. अशातच या मोहाच्या झाडावरील मोहोळ उडाले आणि या मधमाशांनी सरळ गणेश भक्तांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने भाविक घाबरले आणि तिथून मिळेल त्या वाटेने पळ काढला. यातील 15 ते 16 भक्तांना मारेगाव येथे दवाखान्यात आणण्यात आले. येथे उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली. थोडक्यात निभावल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.