यवतमाळ - पुसद उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका अधिकारी कैलास गणपत मुधोळकर हे आरोग्य विभागाच्या ओळखपत्रासह पेट्रोल भरण्याकरता जात असताना त्यांना पुसद शहर पोलिसांच्या डीबी पथकातील कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने रक्तस्त्राव सांडलेल्या ठिकाणी डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी पाणी टाकून धुऊन टाकले, अशी माहिती आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांस मारून आपली चूक झाल्याचे लक्षात येताच डिबी पथकाने जखमी मुधोळकरांना शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन लेटरवर जखमी रुग्णांचे नाव पत्ता न टाकताच औषधी लिहून घेतली. त्यानंतर कैलास मुधोळकर याना छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणून सोडण्यात आले, असे मुधोळकर यांनी सांगितले.