यवतमाळ - क्रेडिट कार्ड नंबर घेऊन २ लाख ५७ हजारांचा गंडा घालणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. यातील मुख्य सूत्रधार हा मध्यप्रदेश येथील भोपाळचा रहिवासी आहे. अवधूतवाडी पोलिसांनी ही कारवाई केली.
क्रेडिट कार्डद्वारे २ लाखांचा गंडा हेही वाचा-'लिव इन'मध्ये राहणाऱ्या तरूणीवर दिवसाढवळ्या जोडीदारानेच केला कोयत्याने हल्ला
याप्रकरणी सागर प्रदीप शेट्टी, (२१, रा. भोपाळ) याच्यासह दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यवतमाळ शहरातील विवेकानंद सोसायटीतील सूर्या अजय शुक्ला यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने फोन करून क्रेडिट कार्ड क्रमांक विचारला. त्याद्वारे त्या व्यक्तीने ऑनलाईन २ लाख ५७ हजार रुपयांची खरेदी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शुक्ला यांनी १२ डिसेंबर रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आरोपीचा शोध घेण्यासाठी एक पथक नेमण्यात आले. यासाठी सायबर सेलची मदत घेण्यात आली. पोलिसांनी भोपाळ येथे जाऊन टोळीला अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, ठाणेदार आनंद वागतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक धिरेंद्र सिंह बिलावल, अमोल पुरी, नासिर शेख, दिगांबर पिलावन, प्रदीप कुऱ्हाडकर, सुधीर पुसदकर यांनी केली.