यवतमाळ -अपहरण व जिवे मारण्याच्या खटल्यात चौघांना तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर आर. पेठकर यांनी आज दिला. चंद्रजित सुभाषचंद्र रुमाले, आशिष गजानन भवराशे, शक्ती रामदास गुल्हाने, संजय विष्णू गुल्हाने अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहे.
कारागृहात झाली ओळख परेड
अरुण विष्णूपंत सरतापे या युवकाचे अपहरण झाले होते. त्याची पोलिसांनी सुटका करून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. अपहरण करून जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणे, अवैधरित्या ताब्यात ठेवणे व छळ केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी चंद्रजित सुभाषचंद्र रुमाले, दिनेश तुळशीराम तोष्णीवाल, विक्की उर्फ अनिल विक्रम डहाके, तुषार सुखदेव गुल्हाने, रोशन विनायक गुल्हाने, आशिष गजानन भवराशे, शक्ती रामदास गुल्हाने, संजय विष्णू गुल्हाने यांना अटक केली. तसेच त्यांची पीडित साक्षदारामार्फत कारागृहामध्ये डमी उभे करून ओळख परेड करण्यात आली.
तपासले दहा साक्षीदार
या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये न्यायालयाने पीडित व प्रत्यक्षदर्शी साक्षदारांची साक्ष ग्राह्य मानून चंद्रजित सुभाषचंद्र रुमाले, आशिष गजानन भवराशे, शक्ती रामदास गुल्हाने, संजय विष्णू गुल्हाने यांना विविध कलमान्वये तीन वर्ष सक्तमजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सहा. सरकारी वकील अॅड. अरुण ए. मोहोड यांनी काम पाहिले.