यवतमाळ - नेर वनविभागाअंतर्गत उत्तरवाढोना येथे बिबट्याची शिकार प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा नेर तालुक्यातील रेनुकापूर शिवारात हरणाची शिकार झाल्याची घटना घडली. वनविभागाने सापळा रचून हरणाच्या मटणासह संशयित महिला आरोपीला ताब्यात घेतले.
विनोद कोहळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नेर
काही दिवसांपूर्वी तालुक्यातील उत्तरवाढोना येथे बिबट्याची शिकार झाली होती. यामध्ये वनविभागाच्या सामूहीक पथकाने घातलेल्या धाडीत बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली होती. यानंतर नेर वनविभागाने तालुक्यातील वन्यजीवाची शिकार करणाऱ्या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली. यावरून आज तालुक्यातील रेनुकापूर परिसरात हरणाचे मटण विक्री करत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला प्राप्त झाली. यावरून नेर वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे यांच्यासह वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठले.
यावेळी वनविभागाने बनावट ग्राहक पाठवून हरणाची मटण विक्री होत असल्याची खात्री करताच तेथील एका संशयित महिला नमुना मिक्सिंग पवार (60 रा. रत्नापुर बेडा) आरोपीला ताब्यात घेतले. हरीण मादी असून त्याचे मांस मटण विक्री करणारे तराजू यासह एक दुचाकी (एमएच 29 बी 8487) जप्त करण्यात आली आहे. हरणाच्या शिकार प्रकरणात अन्य कोणत्या आरोपींचा समावेश आहे का? याआधी अन्य किती वन्यप्राण्यांची शिकार त्यांच्याकडून करण्यात आली का? हरणाचे मटन घेणाऱ्या ग्रहकांचाही शोध घेतला जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्याने सांगितले.
या प्रकरणाचा तपास नेर वनविभागाकडून करण्यात येत आहे. आरोपीविरूद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कलम कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय वन अधिकारी मकरंद गुजर यांच्या सूचनेवरून नेर वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे, क्षेत्र सहायक आर. डी. जाधव, वनरक्षक पी. बी. खत्री, वनरक्षक सृष्टी लक्षण राठोड यांनी केली आहे.