महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उमरखेड पोलीस दलात पाच जण 'एसीबी'च्या ताब्यात, दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी

चाळीस हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी उमरखेड पोलीस दलातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली असून पाचही जणांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

उमरखेड पोलीस ठाणे
उमरखेड पोलीस ठाणे

By

Published : Mar 17, 2020, 5:01 PM IST

यवतमाळ- चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई उमरखेड येथे करण्यात आली. यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

उमरखेड तालुक्यातील सुकळी येथील एका व्यक्तीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार, पोलीस निरीक्षक संजय खंदाडे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगोले, पोलीस कर्मचारी सुभाष राठोड, शेख मुनिर शेख मेहबूब अशी लाचखोरांची नावे आहेत.

तक्रारदार यांच्यावर दाखल असलेल्या गुन्हामध्ये चार्जशिट न पाठवता 'ब' फायनल पाठवून गुन्ह्यात मदत करण्यासाठी उमरखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय खंदाडे यांचे रायटर सुभाष राठोड यांनी तीस हजार रूपयांच्या लाचेची मागणी खंदाडेंसाठी व दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी सरकारी वकिलांसाठी केली होती. खंदाडे यांनी आपल्या कक्षामध्ये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. लाचेची रक्कम सुभाष राठोड यांच्या मार्फत स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगोले यांनी तक्रारदार यांच्यावर दाखल असलेल्या दुसर्‍या गुन्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सहमतीने तक्रारदार यांना या गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

उपविभागीय पोलीस अधिकारी तोटावार यांनी दोन्ही गुन्ह्यात तक्रारदारास मदत करण्यासाठी काम करण्याच्या मोबदल्यात बक्षीस स्वरूपात लाचेची मागणी केली. मुनीर शेख यांनी तक्रारदारावर दाखल गुन्ह्यात तोटावार यांच्याशी लाचेबाबत बोलणी व मध्यस्थी करून सहकार्य केले. कारवाई दरम्यान सुभाष राठोड यांना संशय आल्याने लाच रक्कम न स्वीकारता पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पाचही पोलिसांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने सर्वांना दोन दिवसाची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.

होही वाचा -कोरोना इफेक्ट; रात्री आठ वाजेपर्यंतच बार, रेस्टॉरंट राहणार सुरू

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details