यवतमाळ - जुलै ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये पिकावर फवारणीची कामे केली जातात. दोन तीन वर्षांपासून फवारणीमुळे विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सन 2016 मध्ये 106 रुग्ण, 2017 मध्ये 511 रुग्ण व 2018 मध्ये 170 रुग्ण भरती झाले होते. त्यापैकी 2016 मध्ये सहा लोक मृत्यूमुखी पडले तर 2017 मध्ये 13 जणांचा मृत्यू झाला होता. 2018 मध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावर्षीसुध्दा शेतकऱ्यांनी फवारणीबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी केले आहे.
फवारणीमुळे विषबाधा ही शरीरावर फवारणीचे पाणी सांडल्यामुळे किंवा डोळ्यामध्ये गेल्यामुळे किंवा श्वसनाद्वारे विषबाधा होवू शकते. मोनोक्रोटोफॉस, प्रोफेनोफॉस, क्वीनालफॉस, सीफेट, डायमोथेएट, डायक्लोरोफॉस या औषधांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
- काय घ्यावी खबरदारी?
फवारणी करणाऱ्या व्यक्तीने पायामध्ये गमबुट, हातमोजे, तोंडावर मास्क व पुर्ण शरीर झाकून जाईल असा कोट घालावा व चष्म्याचा वापर करावा. शेतात फवारणी करणाऱ्या व्यक्तीने मद्य पिऊन फवारणी करू नये किंवा तंबाखू सेवन करू नये. फवारणी करणाऱ्यांनी जेवनाच्या अगोदर हात स्वच्छ साबणाने धुवावेत.