यवतमाळ- यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली. शेतकऱ्यांना कुठे दुबार, तर कुठे तिबार पेरणी करावी लागत आहे. पेरणीनंतर पिकांची कोवळी रोपे वर आली खरी. परंतु वणीसह, झरी व मारेगाव तालुक्यात रोही, रानडुकरांचा प्रचंड धुडगूस सुरू असल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. ही जनावरे जमिनीच्यावर आलेली रोपे उखडून फेकत असल्याने याचा शेतकऱयांना मोठा फटका बसत आहे. वनविभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा किंवा शेतात येणाऱ्या या जनावरांना ठार मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान; शेतकरी त्रस्त
एकीकडे पाऊस न आल्याने पिके तग धरत नाही तर दुसरीकडे थोडीफार आलेली पिके वन्यप्राणी खरडून नेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अनेक वर्षापासून होत असलेल्या या नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त आहे.
अलिकडील काही वर्षात रोही व रानडुकरांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. वणी परिसरात मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणी आहे. वेकोलिने मातीच्या मोठ्या ढिगाऱयांवर बाभळीची झाडे लावली आहेत. बाभळीचे बन आता वाढले असून यातच हे वन्यजीव मोठ्या संख्येने अधिवास करून राहतात. खाणीच्या अवतीभोवती शेतकऱ्यांची हजारो एकर शेती आहे. दरवर्षी येथील शेतकऱ्यांना या वन्यजीवांचा उपद्रव सहन करावा लागतो. या सर्व प्रकारात वेकोलि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वेकोलिने जंगल क्षेत्राला तारेचे कुंपण करून वन्यजीवांचा अटकाव करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
मागील काही वर्षात निसर्गाचे चक्र बदलल्याने शेती व्यवसाय अगोदरच धोक्यात आला आहे. त्यात आता वन्यजीवांचा धुमाकूळ भर घालत आहे. असे असताना वनविभाग मात्र या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येते.