यवतमाळ - उसनवार, उधार पैसे जमा करुन सोयाबीन, कपाशी आणि तूर या पिकांचा विमा उतरविला. मात्र, नैसर्गिक संकट ओढवले त्यावेळी पिक विमा कंपन्यांनी मदत देण्यास नकार दिला. त्यामुळे पूर्ण खरीप हंगाम हातातून गेला. नुकसान भरपाई सुद्धा पिक विमा कंपनी देत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी 'जबाब दो' आंदोलनादरम्यान व्यक्त केल्या.
प्रत्येक शेतकऱ्यांजवळ मोबाईल असतोच का?
पिक विमा कंपन्यांनी आपल्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. पिकांचे नुकसान झाल्यास 72 तासांमध्ये कंपनीना कळविणे बंधनकारक केले. तेही मोबाईलवरुन माहिती भरणे किंवा फोन करणे हे बंधनकारक केले. पण, प्रत्येक शेतकऱ्याजवळ मोबाईल असतोच असे नाही. त्यातही संबंधित माहिती इंग्रजीमध्ये भरावी लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी समोर जावे लागते. शेतात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान वाचविण्याचा प्रयत्न करावा की पिक विमा कंपन्यांकडे जाऊन माहिती द्यावी, असा प्रश्नही यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला. विमा कंपनीमध्ये पिकांचा विमा काढताना अशी कुठलीच माहिती देण्यात आली नाही. मात्र, ऐन वेळी नियमांवर बोट ठेवून विमा कंपन्या शेतकऱ्यांना धारेवर धरत आहेत, असा आरोपही यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आला.