यवतमाळ - समाजात मुलींचा जन्म होण्यापूर्वीच त्यांना गर्भात मारण्याचे प्रकार घडत असतात. मात्र ,समाजात अशी काही कुटुंबे आहेत, जी मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा करतात. यवतमाळ जिल्ह्यातील पूसद लगतच्या श्रीरामपूर या गावात मुलीच्या जन्माचे मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात आले.
वाजत-गाजत केले कन्या प्राप्तीचे स्वागत; चिमुकलीच्या पावलाने लक्ष्मी आल्याचा विश्वास
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद लगतच्या श्रीरामपूर या गावात मुलीच्या जन्माचे मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात आले. नवजात कन्येला लक्ष्मी समजुन बॅंड-बाजाच्या गजरात, नाचून गाऊन तिचे स्वागत केले.
जिल्ह्यातील पुसद लगतच्या श्रीरामपूर येथील ममता प्रकाश खडके यांचा विवाह मागील वर्षी औरंगाबाद येथील चतूर कुटुंबामध्ये झाला होता. नुकताच तिने मुलीला जन्म दिला. तिच्या सासरच्यांनी घरी येणाऱ्या नवजात कन्येला लक्ष्मी समजून बॅंड-बाजाच्या गजरात, नाचून गाऊन तिचे स्वागत केले. चिमुकलीचे वडील अभिषेक चतूर, काका स्वप्निल चतूर व संपूर्ण चतूर कुटूंबाने अशाप्रकारे कन्येचे स्वागत करुन पुरुष प्रधान संस्कृतीला चपराक दिली आहे. त्यांनी पुन्हा मातृसत्ताक संस्कृतीचा संदेश दिला आहे. ममता आणि तिच्या कुटुंबाने वाजत-गाजत आपल्या लक्ष्मीरुपी कन्येचे स्वागत केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे चतुर कुटूंबाचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.