यवतमाळ- 'एकता असोसिएशन'ने वेकोली कोळसा खाणीच्या निलजई कंपनी (2) च्या गेटसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. कंपनीमध्ये गावातील बेरोजगार युवकांना कामावर घेत नसल्याने या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यामधील एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालवल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रोजगाराच्या प्रश्नावर 'एकता असोसिएशन'चे आमरण उपोषण, एकाची प्रकृती खालावली
निलजई या कोळसा खाणीत माती काढण्याचे काम एच. डी. गौरव या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. पुढील 5 वर्षे ही कंपनी येथे काम करणार आहे.
निलजई या कोळसा खाणीत माती काढण्याचे काम एच. डी. गौरव या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. पुढील 5 वर्षे ही कंपनी येथे काम करणार आहे. कंपनीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवशकता असते. मात्र, या ठिकाणी स्थानिक युवकांना प्राधान्य न देता परप्रांतियांना कामावर घेतले जाते. त्यामुळे स्थानिकांनी आंदोलन छेडले आहे.
स्थानिक युवकांना कामासाठी प्राधान्य द्यावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. या परिसरातील तरोडा, निलजई, बेलोरा व उकणी या 5 गावातील शेकडो युवक बेरोजगार आहेत.
त्यामुळे त्यांना कामावर घ्यावे, यासाठी एकता असोसिएशनच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी शिरपूर पोलीस व कंपनी प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये बैठक झाली होती. यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, कोणताही तोडगा न निघाल्यामुळे स्थानिकांनी आमरण उपोषणाला सुरवात केली. यामधील एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालविल्यामुळे त्याला रुग्णालयात भरती केले आहे. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.