यवतमाळ : यंदा सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस पडेल असे भाकित हवामान खात्याने केले होते. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली होती. तर काही शेतकऱ्यांनी मृग बरसल्या शिवाय पेरणी करायचे नाही अशी भूमिका घेतली होती. दरम्यान, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एक-दोन सरी चांगल्या बरसल्या. त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस झाला त्या परिसरातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु नंतरच्या काळात समाधानकारक पाऊस झाला नाही. सात लाख हेक्टर क्षेत्रातील कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी या पिकांच्या पेरण्या आता धोक्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे.
पाण्याअभावी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर...
भारतीय हवामान खाते, स्कायमेट आणि इतर हवामान अभ्यासक संस्थांनी यंदा सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस पडेल असा, अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात मात्र संपूर्ण मृग नक्षत्रा नंतर आर्द्रा नक्षत्र ही कोरडे गेले.
भारतीय हवामान खाते, स्कायमेट आणि इतर हवामान अभ्यासक संस्थांनी यंदा सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस पडेल असा, अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात मात्र संपूर्ण मृग नक्षत्रा नंतर आर्द्रा नक्षत्र ही कोरडे गेले. दरम्यानच्या काळात झालेला तुरळक पाऊस शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करून गेला होता. कृषी विभागाने परिसरात ७५ ते १०० मिलिमीटर पर्जन्यवृष्टी झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये असे आवाहन केले होते. असे असुनही पेरणीला जास्त उशिर झाला तर उत्पादनावर परिणाम होतो, ही बाब लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या केल्या. सद्यःपरिस्थिती मध्ये शेतातील पिके डवरणीला आलेली आहेत.
ज्यांनी धूळ पेरणी केली होती, अशा शेतकऱ्यांची पेरणी बहुतांश प्रमाणात बाद झाली आहे. एकंदरीत सध्या पिकांना पावसाची तीव्र आवश्यकता आहे. गेल्या १५ दिवसात पाऊस न झाल्यामुळे शेतात निघालेली पिके आता कोमेजू लागली आहे. १ जून ते १९ जुलै दरम्यान ३० टक्के पाऊस बरसतो. त्या तुलनेत यावर्षी झालेला पाऊस १४ टक्के पेक्षाही कमी आहे. अत्यल्प पाऊस झाल्यामुळे आता शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहे.
मागील वर्षीही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे नैसर्गिक जलस्त्रोताची साधने नदी-नाले, जंगलातील तलाव, शेतातील विहिरी व इतर जलस्त्रोतांची साधने आधीच कोरडी पडली आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरींमध्ये थोड्याफार पाण्याची व्यवस्था आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये विद्युत पुरवठा बहुतांश वेळा सिंगल फेज केला जात असल्यामुळे, त्यांच्याकडे असलेली पाण्याची व्यवस्था देखील कुचकामी ठरत आहे.
एकीकडे सरकार म्हणते की कृषी क्षेत्राला वीज कमी पडू देणार नाही तर दुसरीकडे विद्युत विभाग आपल्या मनाप्रमाणे कारभार करीत आहे. सदर विभाग जर कृषिक्षेत्राला विद्युत पुरवठा करू शकत नसेल तर त्यांनी स्पष्टपणे जाहीर करावे. जर शेतकऱ्यांना व्यवस्थित वीज पुरवठा झाला तर किमान जेवढी सिंचन व्यवस्था होऊ शकते तेवढी व्यवस्था करून शेतकरी आपली पिके जगवू शकतात, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.
एकंदरीत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर नैसर्गिक संकटाची टांगती तलवार लटकली आहे. येत्या दोन दिवसात जर पाऊस झाला नाही तर ९० टक्के पिके नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.