यवतमाळ- जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 14 वरून शनिवारी एकदम 34 वर पोहोचल्याने चिंतेत भर पडली आहे. 25 एप्रिलला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार एकूण 20 रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आयसोलेशन वॉर्डमध्ये सद्यस्थितीत एकूण 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भरती असून त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत.
नव्याने पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे पूर्वी भरती असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कात आले होते. तसेच त्यांच्या तीन कुटुंबातील सदस्यांचा यात समावेश आहे. मागील काही दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या या रुग्णांचा रिपोर्ट शनिवारी महाविद्यालयाला प्राप्त झाला.
आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत एकूण 261 नागरिक भरती असून शनिवारी सकाळी 163 नमुने तपासणीकरीता नागपूरला पाठविले आहे. 24 तासात एकूण 38 रिपोर्ट प्राप्त झाले असून यापैकी एकूण 20 पॉझिटिव्ह, 14 निगेटिव्ह तर चार जणांचे रिपोर्ट तपासणीकरीता पुन्हा पाठविण्यात येणार आहेत, असे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले.
संस्थात्मक विलगीकरणात एकूण 100 तर गृह विलगीकरणात एकूण 829 जण आहेत. शहरात प्रतिबंधित असलेल्या भागाचा जिल्हा प्रशासनाकडून नियमित सर्वे सुरू आहे. यात प्राप्त नमुनेसुध्दा प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टीने रँडम पध्दतीने तपासणीकरीता पाठविण्यात येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने समोर येऊन प्रशासनास माहिती द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी आपल्या घरातच राहावे. शासन व प्रशासनाच्या दिलेल्या सुचनांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणू संसर्गाची मानवी साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.